कुत्रे, मांजर यासारखे पाळीव प्राणी पाळायचे झाल्यास आता विशिष्ट कर भरावा लागणार आहे. पंजाब सरकारने याबाबत एक परिपत्रक काढले आहे. भारतात पहिल्यांदाच अशा प्रकारचा कर आकारण्यात येणार आहे. माजी क्रिकेटपटू आणि पंजाबचे पर्यटनमंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांच्या खात्याने हा निर्णय घेतला आहे.

पंजाब सरकारच्या या परिपत्रकानुसार, नागरिकांना मांजर, कुत्रं, गाय, म्हैस, घोडा, डुक्कर, शेळी, मेंढी, हरिण यांसाऱखे पाळीव प्राणी पाळायचे असतील तर त्याकरिता प्रत्येक प्राण्यासाठी वर्षाला विशिष्ट कर भरावा लागणार आहे. यामध्ये कुत्रा, मांजर, डुक्कर, मेंढी, हरिण यांसारख्या छोट्या प्राण्यांसाठी २५० रुपये प्रतिवर्ष आणि म्हैस, बैल, उंट, घोडा, गाय, हत्ती यांसाऱखे प्राणी पाळायचे असतील तर त्यासाठी ५०० रुपये प्रति वर्ष इतका कर संबंधित मालकाला भरावा लागणार आहे.

त्याचबरोबर अशा प्रत्येक पाळीव प्राण्याला विशिष्ट ब्रँडिंग कोड देण्यात येणार आहे. यामध्ये ओळखीसाठी चिन्ह किंवा क्रमांक तसेच या प्राण्यांच्या शरीरावर मायक्रो चीपही बसवण्यात येणार असल्याचे पंजाब सरकारने परिपत्रकाद्वारे आपल्या आदेशात म्हटले आहे. त्याचबरोबर आता पंजाबमधील पाळीव प्राण्यांच्या मालकांना संबंधित यंत्रणेकडून परवाना घेणे बंधनकारक असणार आहे. या परवान्याचे त्यांना दरवर्षी नव्याने नुतनीकरण करावे लागणार आहे. पंजाब सरकारच्या निर्णयावरुन गोंधळ होण्याची शक्यता आहे. गोवा आणि केरळ राज्यांनतर आता पंजाबमध्ये अनेक गोष्टींवर निर्बंध आणण्यात येत आहेत.