पंजाबमधील गुरदासपूर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपविण्यास पंजाब सरकारने नकार दिला असून राज्य पोलीस दलच या प्रकरणाचा तपास करील, असे म्हटले आहे.पंजाब पोलीस या प्रकरणाची चौकशी करीत असून हे प्रकरण राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवू नये, असे पंजाब सरकारने केंद्रीय गृहमंत्रालयाला स्पष्ट केले आहे. या प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेची मदत घ्यायला पंजाब पोलिसांना निश्चित आवडले असते, असेही पंजाब सरकारने म्हटले आहे.
राष्ट्रीय तपास यंत्रणा एखाद्या प्रकरणाचा तपास करण्याची मागणी स्वतहून करू शकते. मात्र, त्यांनी अशी कोणतीही मागणी केलेली नसल्याने केंद्र सरकारने पंजाब पोलिसांकडे तपास कायम ठेवण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती गृह मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
राष्ट्रीय तपास यंत्रणेने उधमपूरजवळ पकडण्यात आलेल्या दहशतवादी मोहम्मद नावेद याकूब प्रकरणी स्वत:हून तपास करण्याचा निर्णय घेतला होता. २७ जुलै रोजी पंजाबमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सात जण मारले गेले होते. या हल्ल्यातील दहशतवादी लष्कर-ए-तोयबा किंवा जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे होते असा पोलिसांना संशय आहे.