झारखंडचे दहावे मुख्यमंत्री म्हणून भाजपच्या रघुवर दास यांनी रविवारी पद व गोपनीयतेची शपथ घेतली. ते राज्याचे पहिलेच बिगर आदिवासी मुख्यमंत्री आहेत. दिल्लीत धुके असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप अध्यक्ष अमित शहा शपथविधीला उपस्थित राहू शकले नाहीत.
बिरसा मुंडा फुटबॉल मैदानावर झालेल्या शपथविधी सोहळ्यात दास यांच्याबरोबर निलकांत सिंह मुंडा, चंद्रेश्वर प्रसाद सिंह, लुईस मरांडी या भाजपच्या तीन मंत्र्यांबरोबर आजसूचे चंद्रप्रकाश चौधरी यांचा कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश करण्यात आला आहे. रघुवर दास जमशेदपूर (पूर्व) मतदारसंघातून मोठय़ा मताधिक्याने विजयी झाले आहेत. यापूर्वीच्या विविध मंत्रिमंडळांमध्ये त्यांनी काम पाहिले आहे. २००९ मध्ये शिबू सोरेन यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे.
शपथविधीला केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू, नितीन गडकरी, उपेंद्र कुशवाह, सुदर्शन भगत यांच्यासह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, छत्तीसगडचे रमण सिंह उपस्थित होते.

कामगार ते मुख्यमंत्री
रघुवर दास यांची राजकीय कारकीर्द १९७६-७७ साली सुरू झाली. जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनात विद्यार्थी म्हणून सहभागी झालेले दास यांचा मुख्यमंत्रिपदी विराजमान होईपर्यंतचा प्रवास टाटा स्टील कंपनीत कामगार म्हणून सुरू झाला. भाजपामध्ये कार्यकर्ता म्हणून प्रवेश घेतल्यानंतर दास त्यांनी जमशेदपूर पूर्व या मतदारसंघातून विधानसभेसाठी नामांकन मिळाले. तेव्हापासून सलग पाच वेळा ते आमदार म्हणून निवडून आले आहेत.