उत्कल एक्स्प्रेस अपघातप्रकरणी अहवाल सादर करण्याचे रेल्वेमंत्र्यांचे आदेश

उत्तर प्रदेशात मुझफ्फरनगर जिल्ह्य़ात उत्कल एक्स्प्रेसचे १४ डबे रुळावरून घसरून झालेल्या अपघाताची ताबडतोब चौकशी करून सकृतदर्शनी पुराव्यांच्या आधारे जबाबदारी आजच्या आज निश्चित करून अहवाल सादर करा, असे आदेश रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिले आहेत.

रेल्वेमार्गावरील डबे दूर करणे व त्यांची पुन्हा दुरुस्ती करणे तसेच मदतकार्य यावर आपण लक्ष ठेवून आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले. उत्कल एक्स्प्रेसचे चौदा डबे घसरून झालेल्या अपघातात २३ ठार तर १५६ जण जखमी झाले होते. सात डबे रुळावरून काढण्यात यश आले असून आता आणखी डबे बाजूला घेतले जातील व जखमींना चांगली वैद्यकीय सुविधा दिली जाईल, असे प्रभू यांनी ट्विटरवर म्हटले आहे. वरिष्ठ अधिकारी व वैद्यकीय अधिकारी यांनी घटनास्थळी जाऊन जखमी व त्यांच्या नातेवाईकांना या कठीण परिस्थितीला तोंड देण्यात मदत करावी, असे त्यांनी स्पष्ट केले. प्रभू यांनी या रेल्वे अपघाताची चौकशी करण्याचे आदेश कालच दिले असून दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाईल, असे संकेत दिले आहेत. मृतांच्या नातेवाईकांना साडेतीन लाख, जखमींना पन्नास हजार रुपये, तर किरकोळ जखमींना २५ हजार रुपये भरपाई देण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

१५६ जण जखमी

पश्चिम उत्तर प्रदेशात उत्कल एक्स्प्रेस रुळांवरून घसरून झालेल्या अपघातात १५६ लोक जखमी झाले असल्याचे उत्तर प्रदेशच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने रविवारी सांगितले. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर आहे, असे मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव अवनीश कुमार अवस्थी यांनी सांगितले. जखमी प्रवाशांना मेरठ व मुझफ्फरनगर येथील रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. २६ जणांची प्रकृती गंभीर आहे, असे रेल्वे मंत्रालयाने रविवारी सकाळी जारी केलेल्या पत्रकात सांगितले होते.

अपघात रोखण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान

रेल्वेचे अपघात रोखण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात येणार असून या तंत्रज्ञानाची चाचपणी सुरू आहे. त्यानुसार सर्व रेल्वे गाडय़ांमध्ये नवे डबे लावण्यात येणार असून हे डबे सुरक्षेच्या दृष्टीने अत्याधुनिक असणार आहेत.  या नव्या तंत्रज्ञानामुळे रेल्वेचे डबे रुळांवरून घसरण्याचे प्रमाणही कमी करणे शक्य होणार आहे, अशी माहिती वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्याने दिली. अत्याधुनिक लिंके हॉफमन बुश असे या नव्या डब्यांचे नाव आहे. खतौलीसारखी दुर्घटना घडल्यास जीवितहानी रोखणे शक्य होणार असल्याचेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले. हे अत्याधुनिक डबे भारतीय रेल्वेत काही ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले असून, पुढील वर्षी त्यांचे प्रमाण तीन हजारांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.

दुरुस्ती काम सुरू असल्यानेच अपघात

रेल्वेमार्ग निगा व दुरुस्तीचे काम सुरू असल्यामुळे उत्कल एक्स्प्रेसला उत्तर प्रदेशात अपघात झाला असावा, असा प्राथमिक निष्कर्ष रेल्वे अपघाताच्या चौकशीत काढण्यात आला आहे. रेल्वे मंडळाचे वाहतूक सदस्य महंमद जमशेद यांनी सांगितले, की रेल्वेमार्गावर निगा दुरुस्तीचे काम सुरू होते त्यामुळे उत्कल एक्स्प्रेसचे डबे घसरले असावेत. अपघात झाला त्या खातौली या ठिकाणी भेट दिल्यानंतर ते बोलत होते. रेल्वेमार्गावर काही दुरुस्तीची साधने पडलेली होती, असे सांगून ते म्हणाले, की एक ध्वनिफीतही हाती आली असून त्याची चौकशी सुरू आहे. अपघात झाला त्या ठिकाणी रेल्वेमार्ग दुरुस्तीचे काम करताना योग्य ती काळजी घेण्यात आली नाही. प्राथमिक चौकशीचा अहवाल मंत्रालयास सादर करण्यात येणार आहे. रेल्वेने या अपघाताची चौकशी उत्तर परिक्षेत्राचे रेल्वे सुरक्षा आयुक्त करतील असे जाहीर केले आहे. रेल्वेमार्गावर कुठल्या प्रकारचे दुरुस्ती काम सुरू होते याची शहानिशा रेल्वेचे सुरक्षा आयुक्त करतील. यात नियमांचे पालन झाले की नाही हे तपासण्यात येईल.