सुरक्षाविषयक सव्वा लाख रिक्त पदे भरण्याचा निर्णय

लागोपाठच्या अपघातांमुळे नैतिक जबाबदारीतून तत्कालीन मंत्री सुरेश प्रभू यांना राजीनामा द्यावा लागल्यानंतर रेल्वे मंत्रालय खडबडून जागे झाले असून सुरक्षाविषयक सुमारे एक लाख रिक्त पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला गेला. गेल्या काही दशकांमध्ये एवढय़ा मोठय़ा संख्येने रेल्वेमध्ये एकाचवेळी भरती झालेली नाही. सध्या एकूण सव्वालाख सुरक्षाविषयक पदे रिक्त आहेत.

रेल्वेमधील भरती प्रक्रिया सातत्याने चालणारी असली तरी सुरक्षाविषयक सुमारे एक लाख पदे तातडीने भरण्यावर भर देणार आहोत. नुकत्याच झालेल्या वरिष्ठ अधिकारयांच्या बैठकीमध्ये रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी भरतीप्रक्रिया वेगवान करण्याची सूचना केली. त्यासाठी एक वर्षांची कालमर्यादा ठरविली आहे, असे रेल्वे मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले. अगोदर चालू वर्षांत पंचवीस हजार पदे भरण्याचा निर्णय झाला होता; पण अपघातांवरील टीकेनंतर आणि गोयल यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर भरती संख्या एक लाखांपर्यंत नेण्याचा धोरणात्मक निर्णय झाला. या पदांना अगोदरच मान्यता असल्याने केंद्रीय मंत्रिमंडळाची पुन्हा मंजुरी अपेक्षित नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

रेल्वे मंत्रालयाशी संबंधित संसदीय समितीने मध्यंतरीच सादर केलेल्या अहवालामध्ये सुरक्षाविषयक सव्वा लाख पदे रिक्त असल्याबद्दल चिंता व्यक्त केली होती आणि केंद्राचे कानही ओढले होते.

समितीच्या अहवालानुसार, एक एप्रिल २०१६नुसार, रेल्वेमध्ये एकूण २ लाख १७ हजार ३६९ जागा रिक्त आहेत आणि त्यात सुरक्षेविषयक रिक्तपदांची संख्या १ लाख २२ हजार ७६३ इतकी आहे. त्यातही ४७ हजार पदे विविध विभागातील अभियंत्यांची आणि तब्बल ४१ हजार पदे सर्वाधिक महत्वपूर्ण असलेल्या गँगमनची आहेत.

रेल्वेच्या अवाढव्य सुरक्षेची जबाबदारी वाहून नेण्यासाठी सुमारे साडेसात लाख कर्मचारयांची आवश्यकता आहे; पण सध्या फक्त ६ लाख २३ हजारच कर्मचारी गाडा ओढत आहेत. यामुळे कामाचा अधिक बोजा, पुरेशी विश्रांती आणि वेळेवर रजा मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांवर अत्याधिक ताण आहे. त्यातून सुमारे ७५ टक्के अपघातांना मानवी म्हणजे कर्मचाऱ्यांच्या चुका कारणीभूत असल्याची आकडेवारी आहे.