राजस्थानमध्ये गरिबीची थट्टा उडवणारी एक घटना घडली आहे. जयपूरजवळील दीड लाख घरांच्या बाहेर ‘मी गरीब आहे,’ असे फलक लावण्यात आले आहेत. जयपूरपासून ६० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या दौसामध्ये हा प्रकार घडला आहे. दौसा जिल्हा परिषदेकडून दीड लाख घरांच्या बाहेर लोकांच्या गरिबीची चेष्टा करणारे फलक लावण्यात आले आहेत.

कोणकोणत्या घरांना अनुदानित अन्नपुरवठा केला जातो, हे ओळखण्यासाठी दौसामधील तब्बल दीड लाखांबाहेर ‘मी गरीब कुटुंबातील आहे. मी अनुदानित अन्नधान्य घेतो,’ असा मजकूर असलेले फलक लावण्यात आली आहेत. या फलकांच्या खाली त्या घरामधील व्यक्तीचे नाव लिहिण्यात आले आहे. त्यामुळे राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि भाजपवर मोठ्या प्रमाणात टीका होते आहे.

‘आधी आम्हाला गहू मिळत नव्हते. मात्र घराबाहेरील भिंतीवर फलक लावण्यात आल्यानंतर आम्हाला अनुदानित अन्नधान्य मिळू लागले. मात्र गावात राहणारे इतर लोक आमची चेष्टादेखील करु लागले,’ अशी माहिती दौसातील भांक्री गावातील सीताराम यांनी म्हटले. दौसामधील जवळपास ७० टक्के लोक अनुदानित अन्नधान्य घेतात. या सर्व घरांच्या भिंतींवर ‘मी गरीब आहे,’ असा मजकूर लिहिलेले फलक लावण्यात आले आहेत. ‘अनुदानित अन्नदान्य लाभार्थींपर्यंत पोहोचावे, कोणा मध्यस्थाने किंवा श्रीमंत व्यक्तीने अनुदानित अन्नावर डल्ला मारु नये, या हेतूने स्थानिकांच्या घराबाहेर फलक लावले आहेत,’ अशी सारवासारव काही शासकीय अधिकाऱ्यांनी केली आहे. काँग्रे सरकारने राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायदा आणला होता. या कायद्यांतर्गत गरिब कुटुंबांना स्वस्त दरात अन्नधान्याचा पुरवठा केला जातो.

‘मला १५ किलो गहू मिळत असल्याने मी घराच्या भिंतीवर त्यांना फलक लावण्याची परवानगी दिली. आता गावातील लोक मला हा फलक का लावण्यात आला, अशी विचारणा करतात. त्यामुळे मला अपमानास्पद आणि लज्जास्पद वाटते. लोक माझी थट्टादेखील करतात. गावातील लोक माझ्या गरिबीची चेष्टा करतात,’ असे दौसा जिल्हा परिषदेतील एका गावात राहात असलेल्या ६५ वर्षीय सोनी देवी यांनी सांगितले.