भ्याडपणे दहशतवादी हल्ले करणाऱ्यांना भारतीय सैन्य चोख प्रत्युत्तर देईल, असे म्हणत गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला अप्रत्यक्षपणे इशारा दिला आहे. दहशतवादी कारवायांच्या माध्यमातून भारताला अस्थिर करु पाहणाऱ्यांना भारतीय सैन्याकडून जशात तसे उत्तर दिले जाईल, असे राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. शहीद दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात राजनाथ सिंह बोलत होते. जम्मू काश्मीरमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

‘सरकार देशाची मान कधीही कोणासमोर झुकू देणार नाही. आम्ही शेजाऱ्यांना बदलू शकत नाही. आपल्या शेजाऱ्यांकडून वारंवार दहशतवाद आणि दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन दिले जाते. दहशतवाद हे शूरांचे अस्त्र असू शकत नाही. दहशतवादाचा आधार भ्याड लोकांनाच घ्यावा लागतो, हे त्यांनी समजायला हवे,’ असेही राजनाथ सिंह यांनी म्हटले.

शहीद दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना राजनाथ सिंह यांनी उरीनंतर लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकचादेखील उल्लेख केला. ‘ते किती भ्याडपणे हल्ला करु शकतात, हे तुम्ही पाहिले आहे. मात्र त्यांच्या कुरापतींना भारतीय जवानांनी दिलेले प्रत्युत्तर अतिशय उल्लेखनीय आहे. सरकार देशाची मान कोणासमोरही झुकू देणार नाही, याबद्दल मी तुम्हाला आश्वस्त करु इच्छितो,’ असे राजनाथ यांनी म्हटले.

ठाण्यातील एक तरुण आयसिसमध्ये दाखल झाल्याचे वृत्त दोन दिवसांपूर्वीच आले होते. यावरदेखील राजनाथ सिंह यांनी प्रतिक्रिया दिली. ‘त्यांना (आयसिसला) भारतात कधीही पाय रोवता येणार नाहीत. कारण भारत दहशतवादाला समर्थन देत नाही,’ असे राजनाथ सिंह यांनी म्हटले. ‘जर कोणी बेपत्ता झाले असल्यास त्याच्या कुटुंबियांनी मंत्रालयाशी संपर्क साधावा. त्यामुळे त्यांच्या मुलाला परत आणता येईल,’ असेही राजनाथ सिंह पुढे म्हणाले.