केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात दाखल केलेला मानहानीचा खटला ज्येष्ठ वकील राम जेठमलानी लढणार नाहीत. जेठमलानी यांनी केजरीवाल यांना यासंबंधी पत्र लिहून आपण हा खटला लढणार नसल्याचे सांगितले आहे. तसेच या खटल्याचे २ कोटी रुपयांहून अधिक शुल्क अदा करण्यात यावे, असेही त्यांनी म्हटले आहे.

आपल्या सूचनेवरून अरुण जेटलींविरोधात असभ्य भाषेचा वापर केला नसल्याचे केजरीवाल यांनी सांगितल्यानंतर जेठमलानी यांनी हा खटला न लढण्याचा निर्णय घेतला आहे. जेठमलानी यांनी केजरीवाल यांना पत्र लिहून आपण हा खटला लढणार नाहीत, असे सांगितले आहे. तसेच खटल्याचे दोन कोटी रुपयांचे शुल्कही अदा करण्यात यावे, असेही जेठमलानी यांनी म्हटले आहे. केजरीवाल आणि इतर पाच आप नेत्यांविरोधात अरुण जेटली यांनी १० कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल केला होता. या खटल्याच्या सुनावणीवेळी जेठमलानी यांनी केजरीवाल यांची बाजू मांडताना जेटली यांच्याविरोधात असभ्य भाषेचा वापर केला होता. केजरीवाल यांच्या सूचनेवरून असभ्य भाषेचा वापर केला का, याबाबत जेटली यांनी स्पष्टीकरण मागितले होते. त्यावेळी जेठमलानी यांनी आपण केजरीवाल यांच्या सूचनेनुसारच असभ्य भाषेचा वापर केल्याचे सांगितले होते. त्यानंतर जेटली यांनी केजरीवाल यांच्याविरोधात आणखी एक मानहानीचा खटला दाखल केला होता. हा खटला दाखल झाल्यानंतर केजरीवाल यांनी दिल्ली उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले होते. तसेच जेटली यांच्याविरोधात असभ्य भाषा वापरली जावी अशा कोणत्याही सूचना आपण दिल्या नव्हत्या, असे त्यांनी जेठमलानी यांना पत्राद्वारे सांगितले होते. त्यानंतर जेठमलानी यांनी हा खटला लढणार नाही, असे केजरीवालांना सांगितले आहे. तसेच हा खटला लढण्यासाठी आकारले गेलेले शुल्क अदा करण्यात यावे, असे सांगितले आहे. २ कोटी रुपयांपेक्षा अधिक ही रक्कम आहे. दिल्ली सरकारने याआधी जेठमलानी यांना साडेतीन कोटी रुपये शुल्क अदा केले होते. जेठमलानी केजरीवाल यांच्यावतीने ११ वेळा न्यायालयात हजर झाले होते. दरम्यान, मुख्यमंत्री कार्यालयाने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. जेठमलानी यांच्या निर्णयाबाबत आपल्याकडे कोणतीही माहिती नाही, असे मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आले.