भूमिका बदलल्याने उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांच्यावर केंद्रीय मंत्री रामविलास पासवान भडकले

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना २०१९मधील लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्याच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) ठरावावर तुम्ही स्वत:हून सही केलीत. त्यासाठी तुमच्यावर कुणी दबाव आणला नव्हता किंवा जबरदस्ती केली नव्हती. मग आता तुम्ही मोदी सरकारवर का टीका करीत आहात?,’ असा बोचरा आणि थेट सवाल केंद्रीय मंत्री आणि लोक जनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा  रामविलास पासवान यांनी गुरुवारी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना केला.

१० एप्रिल रोजी झालेल्या ‘एनडीए’च्या बैठकीमध्ये भाजपच्या ३३ मित्रपक्षांनी मोदींच्या नेतृत्वाखाली २०१९च्या लोकसभा निवडणुका लढविण्याचा विशेष ठराव मंजूर केला होता आणि मोदी सरकारच्या कामगिरीवर स्तुतिसुमने उधळली होती. दोन-अडीच वर्षांपासून भाजपबरोबर कमालीचे कडवट संबंध असलेल्या उद्धव ठाकरे यांनीही त्या ठरावाला अनुमोदन दिले होते. त्याचा संदर्भ देत ठाकरेंना उद्देशून पासवान म्हणाले, ‘२०२४पर्यंत पंतप्रधानपद रिक्त नसल्याचे मी त्यांना तेव्हाच स्पष्टपणे सांगितले होते. मोदींच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करणाऱ्या ठरावावर सही करण्यासाठी तुमच्यावर मी किंवा इतर कुणी दबाव आणला नव्हता. जबरदस्ती केली नव्हती. त्या बैठकीत पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल, आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्यापाठोपाठ तुमचे तिसऱ्या क्रमांकाचे भाषण झाले होते. त्यामुळे दबावाचा प्रश्न येतोच कोठे? तेव्हा नेतृत्व मान्य केले, सरकारचे कौतुक केले आणि आता टीका करीत आहात..’

ठाकरे यांच्यावर पासवान चांगलेच भडकण्याचे कारण म्हणजे बुधवारी मुंबईत बोलताना ठाकरे यांनी पासवानांचा संदर्भ दिला होता. ‘२०१९च्या निवडणुका मोदींच्या नेतृत्वाखाली लढविण्याची गोष्ट पासवान करतात. केंद्राला दोन वर्षे बाकी आहेत. राज्य सरकारला अडीच वर्षे बाकी असताना भाजपला मध्यावधीचे डोहाळे लागलेत. जनतेने बळ दिल्यानंतरही तुम्हाला निवडणुकीची स्वप्ने का पडत आहेत?’ अशी टीका त्यांनी केली होती. त्याबाबत गुरुवारच्या पत्रकार परिषदेत छेडले असता पासवान चांगलेच भडकले. ‘एनडीए’च्या बैठकीला महिना झाला. मग ठाकरे आताच का बोलताहेत? इतके दिवस ते गप्प का बसले? असे प्रश्न विचारून ते म्हणाले, ‘‘ठाकरेंनी (खुशाल) ‘सामन्या’तून केंद्र सरकारवर टीका करावी. पण जनता मोदींबरोबरच आहे..’’

भाजप अध्यक्ष अमित शहांनी दोनदा दूरध्वनीवरून सहभागाचे आवर्जून निमंत्रण दिल्यानंतर ठाकरे हे १० एप्रिलला झालेल्या बैठकीसाठी दिल्लीत आले होते. त्यांचा सहभाग, बैठकीमधील त्यांच्या मोदी, शहा, अरुण जेटली, राजनाथसिंह यांच्याबरोबरील मनमोकळ्या संवादाच्या पाश्र्वभूमीवर भाजप-शिवसेनेतील दरी संपल्याचे मानले जात होते. त्या पाश्र्वभूमीवर गप्प बसलेल्या शिवसेनेने आणि ठाकरेंनी अचानकपणे भाजपला पुन्हा लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेच्या या ‘यू-टर्न’वर म्हणून तर पासवान चांगलेच उखडले.

खरे तर त्या बैठकीमध्ये पासवान यांनीच ठाकरेंना जाहीर टीका न करण्याची खास विनंती केली होती. त्या बैठकीत ते म्हणाले होते, ‘‘उद्धवजी, तुम्ही मोदींना (मोठय़ा) भावाप्रमाणे मानता. म्हणजे आपण एका कुटुंबासारखे आहोत. म्हणून तुम्हाला मनापासून एक विनंती आहे. कृपया भाजपवर, सरकारवर जाहीर टीका करू नका.

तुमच्या अडचणी जरूर तुम्ही सांगा. पण जाहीररीत्या टीका केल्याने चुकीचा संदेश जातो. लोक आम्हाला प्रश्न विचारतात.’’ पासवानांच्या त्या टिप्पणीवर ठाकरे थेट काही बोलले नव्हते, पण मंदस्मित करून त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे मानले जाते.