नोटाबंदीच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेकडून सात डिसेंबरला द्वैमासिक पतधोरण जाहीर होणार आहे. रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात अर्धा टक्का घट होण्याची शक्यता आहे. एचएफडीसीचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी केकी मेस्त्री यांनी ही शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे कर्जाचे दर कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्जधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

‘व्याजाच्या दरात कपात होईल, असा माझा अंदाज आहे. ७ डिसेंबरला रिझर्व्ह बँकेची बैठक होणार आहे. या बैठकीत व्याज दरातील कपातीचा निर्णय होऊ शकतो. रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात पाव टक्क्याने कपात होईल, याची खात्री आहे. मात्र सध्या महागाईदेखील कमी झाली आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात अर्धा टक्क्याने कपात केली जाऊ शकते,’ असे केकी मिस्त्री यांनी सांगितले आहे.

अमेरिकच्या फेडरल रिझर्व्हकडून डिसेंबरमध्ये व्याज दर वाढवले जाणार आहेत. अमेरिका व्याज दर वाढवत असून भारताकडून व्याजदरात घट केली जाते आहे. त्यामुळे दोन्ही देशांच्या व्याज दरांमधील अंतर कमी करण्याचा प्रयत्न भारताकडून सुरू आहे. ‘भारतीय चलनाचे मूल्य स्थिर राखणे रिझर्व्ह बँकेसमोरील मोठे आव्हान असेल. अमेरिका व्याज दर कमी करणार असल्याने भारतीय रुपयावरील दबाव वाढणार आहे,’ असेही केकी मिस्त्री यांनी सांगितले आहे.

नोटाबंदीच्या निर्णयामुळे बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोख रक्कम जमा झालेली आहे. हा पैसा बँकांना पुन्हा एकदा बाजारात आणायचा आहे. त्यासाठीच बँकांकडून लवकरच व्याज दरात कपात केली जाईल. जास्तीत जास्त लोकांनी कर्ज घ्यावे, त्यातून बँकांना परतावा मिळावा, यासाठी व्याज दरात घट करण्यात येणार आहे. मागील पतधोरण जाहीर करताना रिझर्व्ह बँकेकडून पाव टक्क्यांची कपात करण्यात आली होती. आता ७ डिसेंबरला पुन्हा एकदा रिझर्व्ह बँकेकडून व्याज दरात घट केली गेल्यास बँकांकडूनही व्याज दरात घट केली जाईल. त्यामुळे कर्जधारकांना मोठा फायदा होणार आहे.