छत्तीसगडमधील सुकमामध्ये काल (सोमवारी) झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात २५ जवान शहीद झाले. छत्तीसगडमधील हल्ल्याचा देशभरातून निषेध व्यक्त होतो आहे. अनेकांनी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहून त्यांच्या कुटुंबीयांबद्दल संवेदना व्यक्त केल्या आहेत. जवानांचे बळी घेणाऱ्या नक्षलवाद्यांविरोधात देशात संतापाची लाट असून त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरते आहे. मात्र या मोठ्या आणि भीषण हल्ल्यानंतर नक्षलग्रस्त भागात पोलीस आणि जवानांकडून नेमक्या कोणत्या चुका होतात, हा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला आहे. नक्षलवाद्यांकडून प्रत्युत्तर देण्यात जवान कुठे कमी पडतात, याचा अभ्यास होऊन हल्ले थांबवण्यासाठी ठोस पावले उचलणे आवश्यक आहे.

१. वाढत्या हल्ल्यांबद्दल बोलताना, ‘नक्षलवाद्यांनी जवानांशी लढण्यासाठी मोठी तयारी केली आहे,’ असे छत्तीसगडचे माजी पोलीस महासंचालक विश्वरंजन यांनी सांगितले. नक्षली तळांवर आता लष्कराच्या तोडीचे प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे जवानांच्या व्यूहनितीची नक्षलवाद्यांना पूर्ण कल्पना असते. लष्कराच्या रणनितीची संपूर्ण कल्पना असल्याने अनेकदा नक्षलवादी यशस्वी ठरतात, असे विश्वरंजन यांनी म्हटले.

२. नक्षलवादी प्रत्येक चकमकीचे विश्लेषण अतिशय बारकाईने करत असल्याची माहितीदेखील विश्वरंजन यांनी दिली. ‘चकमकीचे विश्लेषण कोणतीही यंत्रणा पोलिसांकडे नाही. त्यामुळेच हल्ला नेमका कसा झाला आणि कोणत्या प्रकारे भविष्यात हल्ले होऊ शकतात, याचे काटेकोरपणे विश्लेषण पोलिसांकडून होत नाही. नक्षलवाद्यांकडून चकमकीचे विश्लेषण होत असल्याने त्यांना पोलिसांसह जवानांची कार्यपद्धती आणि रणनिती यांची अचूक माहिती असते,’ असे विश्वरंजन यांनी सांगितले.

३. केंद्रीय राखीव पोलीस दल, आयटीबीपी या नक्षलग्रस्त भागात तैनात केल्या जाणाऱ्या बटालियन्सला प्राथमिक प्रशिक्षण दिले जाते. त्यांना नक्षलवाद्यांशी लढण्यासाठी आवश्यक असणारे पुरेसे प्रशिक्षण दिले जात नाही. नक्षलवाद्यांचा रणनितीचा अभ्यास करुन त्या पद्धतीने प्रशिक्षण देण्यात न आल्याने केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांना जवानांशी दोन हात करणे अवघड जाते, असे विश्लेषण विश्वरंजन यांनी केले.

‘नक्षलवाद्यांशी सामना करताना केंद्रीय राखीव पोलीस दलासारख्या निमलष्करी दलाचा वापर करण्याऐवजी लष्कराचा वापर करायला हवा,’ असे मत विश्वरंजन यांनी व्यक्त केले. ‘बहुतांश नक्षलग्रस्त भाग हा आदिवासीबहुल आहे. या भागातील आदिवासी नक्षलवाद्यांच्या संपर्कात असतात. त्यामुळे या भागात लष्कराचाच वापर करायला हवा,’ असे विश्वरंजन यांनी म्हटले.