देशभरात जिओच्या ग्राहकांची संख्या १० कोटींवर पोहोचली असून सर्वाधिक मोबाईल डेटा वापर होणारी जिओ जगातील पहिली कंपनी बनल्याची माहिती रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी दिली आहे. ३१ मार्चपासून जिओची मोफत सुविधा बंद होणार असून १ एप्रिलपासून नवे दर लागू होतील असेही त्यांनी सांगितले.

रिलायन्स उद्योग समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी मंगळवारी जिओच्या वाटचालीची माहिती दिली. अवघ्या १७० दिवसांमध्ये रिलायन्स जिओने १० कोटी ग्राहकांचा पल्ला गाठला. प्रति सेकंदाला सात ग्राहक जिओच्या सेवेशी जोडले जात आहेत असे मुकेश अंबानी यांनी सांगितले. अंबानी यांच्या भाषणातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मोफत इंटरनेटची सुविधा. मोफत इंटरनेटच्या सुविधेत मुकेश अंबानी वाढ करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र मुकेश अंबानींनी ३१ मार्चपर्यंतच मोफत इंटरनेट सेवा दिली जाईल असे जाहीर केले. १ एप्रिलपासून मोबाईल इंटरनेटसाठी शुल्क आकारले जाईल. पण कोणत्याही नेटवर्कवर मोफत व्हॉईस कॉलिंगची सुविधा सुरुच राहील असे अंबानी यांनी स्पष्ट केले.

जिओचे ग्राहक प्रति महिना १०० कोटी जीबीपेक्षा जास्त डाटा वापरतात. प्रति दिवसा ३.३ कोटी जीबी ऐवढे इंटरनेट वापरले जाते अशी आकडेवारीही त्यांनी जाहीर केली. आम्ही जिओ लाँच केले तेव्हा लवकरात लवकर १० कोटींचा पल्ला गाठण्याचे ध्येय ठेवले होते. पण ऐवढ्या कमी वेळात आम्ही हा पल्ला गाठू असे वाटले नव्हते असे अंबानी यांनी सांगितले. जिओच्या ग्राहकांचे आभार मानतो. तुम्हाला चांगली आणि दर्जेदार सुविधा देण्यासाठी कटीबद्ध राहू असेही त्यांनी सांगितले.