रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प

पुढील महिन्यातील अध्यक्षीय निवडणुकीचा कौल माझा विजय झाला तर मान्य करीन, असे अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकीतील रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. ट्रम्प यांनी निवडणूक निकालास वेळप्रसंगी आव्हान देऊन कायदेशीर लढाईचे सूतोवाच केले आहे.

शेवटच्या अध्यक्षीय चर्चेत त्यांनी असे सांगितले होते की, अध्यक्षीय निवडणुकीचा निकाल मी मान्य करीनच असे नाही, त्यांच्या या वक्तव्याने लोकशाहीच्या पायालाच हादरा बसला आहे अशी चर्चा होती. वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या ट्रम्प यांनी असे सांगितले की, ८ नोव्हेंबरला काही शंकास्पद निकाल लागला तर मी कायदेशीर आव्हान देईन किंबहुना तो माझा अधिकार आहे. त्यांनी डेलावेर येथे त्यांच्या समर्थकांपुढे सांगितले की, देशातील माझ्या मतदार बंधू-भगिनींनो माझा विजय झाला तर मी या ऐतिहासिक अध्यक्षीय निवडणुकीचा निकाल मान्य करीन. ट्रम्प यांचे निकाल मान्य न करण्याचे विधान भयानक असल्याचे हिलरी क्लिंटन यांनी म्हटले होते, तर अध्यक्ष बराक ओबामा यांनी मतदार घोटाळा किंवा निवडणुकांत हेराफेरीचे जे आरोप ट्रम्प यांनी केले आहेत, ते लोकशाहीस कमीपणा आणणारे व घातक आहेत असे म्हटले होते. ट्रम्प यांनी मतदार घोटाळ्याचे आरोप करणे सुरूच ठेवले आहे. त्यांनी अध्यक्षीय चर्चेतही हा आरोप केला व निवडणुकीत नि:पक्षपातीपणा व काही गडबड असता कामा नये, अशी अपेक्षा व्यक्त केली. याचा माझ्याशी काही संबंध नाही, पण देशाच्या भवितव्याशी मात्र नक्की आहे, असे ट्रम्प म्हणाले होते. हिलरी क्लिंटन यांच्या प्रचारमोहिमेचे प्रमुख जॉन पोडेस्टा यांनी आताच्या निवडणुकीत बेकायदेशीर स्थलांतरितांकडे वाहनचालक परवाना असेल, तर त्यांना मतदान करता येईल असे म्हटल्याचे विकिलीक्सने उघड केले होते त्यामुळे मतदार घोटाळ्याचा मुद्दा ट्रम्प यांनी उपस्थित केला. आमच्या प्रचारसभा उधळण्यासाठी हिलरी क्लिंटन यांच्या प्रचारकांनी पैसे वाटले ही वाईट गोष्ट आहे, असा आरोपही ट्रम्प यांनी केला.

निवडणूक गैरप्रकारांसंबंधी ट्रम्प यांचे वक्तव्य धोकादायकओबामा

वॉशिंग्टन – डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुकीतील कथित गैरप्रकारांबद्दल जे वक्तव्य केले आहे ते धोकादायक आणि लोकशाहीची पायमल्ली करणारे आहे, असे मत अध्यक्ष बराक ओबामा यांनी व्यक्त केले. अमेरिकी निवडणुकांच्या इतिहासात प्रथमच एखाद्या अध्यक्षीय उमेदवाराने अशा प्रकारचे वक्तव्य केले आहे. त्यातून देशाच्या लोकशाही व्यवस्थेवरच अविश्वास होत आहे. हे धोकादायक आहे, असे ओबामा यांनी फ्लोरिडा येथील प्रचारसभेत म्हटले.

पुतिन यांच्या घोडय़ाइतकेच डोनाल्ड ट्रम्प धष्टपुष्टहिलरी क्लिंटन

रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्या घोडय़ाइतकेच डोनाल्ड ट्रम्प धष्टपुष्ट असल्याची टीका डेमोकॅट्रिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांनी केली. तिसऱ्या जाहीर चर्चेनंतर क्लिंटन व ट्रम्प हे वाल्डॉर्फ अ‍ॅस्टोरिया येथे एका मेजवानीप्रसंगी आमनेसामने आले होते. दोघेही एकाच रांगेत एक आसन मध्ये सोडून बसले होते. मुस्लिमांवर बंदी व ओबामा यांचे जन्मठिकाण यावरून ट्रम्प यांनी निर्माण केलेल्या वादावरही क्लिंटन यांनी टीका केली. वॉटरगेट कमिशनमधून हकालपट्टी झाल्याचा मुद्दा उकरून त्या भ्रष्टाचारी असल्याची टीका ट्रम्प यांनी क्लिंटन यांच्यावर केली.

सभ्य व्यक्ती महिलांना कमी लेखत नाहीत  – मिशेल ओबामा

वॉशिंग्टन – कोणताही सभ्य पुरुष महिलांना कमी लेखत नाही. अशी वर्तणूक कोणत्याही पुरुषाकडून खपवून घेता कामा नये, देशाचा अध्यक्ष होण्याची मनीषा बाळगणाऱ्या पुरुषाकडून तर अजिबातच नाही, असे अमेरिकी अध्यक्ष बराक ओबामा यांच्या पत्नी मिशेल ओबामा यांनी म्हटले. अ‍ॅरिझोना राज्यातील फिनिक्स येथे डेमॉक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांच्या प्रचारसभेत त्यांनी हे विधान केले. त्यांचा रोख डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरच होता.

आणखी एका महिलेचा ट्रम्प यांच्यावर गैरवर्तनाचा आरोप

न्यूयॉर्क – डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर लैंगिक गैरवर्तन केल्याचे आरोप करणाऱ्या महिलांची संख्या आता दहावर पोहोचली आहे. कारेना व्हर्जिनिया या न्यूयॉर्कमधील ४५ वर्षीय योग प्रशिक्षिकेने ट्रम्प यांच्यावर लैंगिक दुर्वर्तनाचे आरोप केले आहेत. १९९८ साली त्या २७ वर्षांच्या असताना यूएस ओपन टेनिस स्पर्धा पाहण्यास गेल्या होत्या. तेव्हा ट्रम्प हेही हजर होते. ट्रम्प यांनी त्यांच्याबरोबरच्या पुरुषांना म्हटले की, हे पाहा. हिला आपण पूर्वी कधी पाहिले नव्हते. मी कोण आहे तुला माहीत आहे का, असे म्हणत ट्रम्प यांनी आपल्याला जवळ खेचून असभ्य वर्तन केल्याचा आरोप व्हर्जिनिया यांनी केला.