आपल्या पदाचा गैरवापर करून काही उच्चपदस्थ अधिकारी, अतिमहत्त्वाच्या व्यक्ती आणि नोकरशहांनी एका खासगी विमान कंपनीकडून विनामूल्य तिकिटे आणि अन्य सुविधा मोठय़ा प्रमाणावर उकळल्या असून त्यामध्ये काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा आघाडीवर असल्याचा दावा ‘तहलका’ मासिकाने केला आहे.
अशा प्रकारे पदाचा गैरवापर करून या अधिकाऱ्यांनी आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्तींनी सेवा नियमांचे मोठय़ा प्रमाणावर उल्लंघन करून औचित्याचाही भंग केला आहे, असे या मासिकाचे राजकीय संपादक रमेश रामचंद्रन यांनी येथे एका पत्रकार परिषदेत सांगितले.
वढेरा यांनी स्वत:साठी, आपल्या सहकाऱ्यांसाठी, मुलांसाठी आणि आईसाठी परदेशातील तिकिटे आणि अन्य सुविधा विनामूल्य उकळल्या आहेत. पश्चिम बंगालमधील एका ज्येष्ठ आयपीएस अधिकाऱ्याने ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटीमध्ये प्रतिनियुक्तीवर असताना तिकिटांचे अत्यल्प भाडे देऊन २८ वेळा परदेशवाऱ्या केल्या आहेत, असेही ‘तहलका’ने म्हटले आहे.
डीजीसीएचे माजी प्रमुख, नागरी उड्डाण मंत्रालयाचे माजी सचिव, भारतीय पुरातत्त्व विभागाचे माजी महासंचालक आणि एएआयचे माजी अध्यक्ष यांनीही अशाच प्रकारे गैरफायदे लाटले आहेत. ‘तहलका’ने ज्या व्यक्तींवर आरोप केले आहेत त्यांच्यापैकी कोणीही प्रतिक्रिया देण्यास उपलब्ध नव्हते. इतकेच नव्हे तर ‘जेट एअरवेज’ या संबंधित विमान कंपनीकडूनही या बाबत कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.