भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक झालेले सॅमसंग कंपनीचे उपाध्यक्ष ली जी-योंग याची दक्षिण कोरियातील तपास अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली आहे.

ली यांना शुक्रवारी अटक करण्यात आली होती. कंपनीला अनुकूल  धोरण ठरवण्यासाठी देशाच्या माजी अध्यक्ष पार्क ग्वेन ह्य़े यांच्या निकटवर्तीय महिलेला ४० दशलक्ष डॉलरची लाच दिल्याचा ली यांच्यावर आरोप आहे. पार्क यांना महाभियोग चालवून हटवण्यात आले तर त्यांच्या निकटवर्ती व माजी सांस्कृतिक मंत्री चोई सुन सील यांनाही अटक करण्यात आली आहे.

सॅमसंगचे माजी अध्यक्ष ली कुन ही यांना २०१४ साली हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे चिरंजीव ली जी-योंग यांच्या हाती जगातील या सर्वात मोठय़ा मोबाइल फोन निर्मात्या कंपनीची सूत्रे आली. त्यानंतर २०१५ साली सॅमसंग समूहातील सॅमसंग सी अँड टी आणि चील इंडस्ट्रीज या दोन उपकंपन्यांचे विलीनीकरण करण्यास सरकारने अनुकूल धोरण स्वीकारावे म्हणून तत्कालीन अध्यक्ष पार्क यांच्या निकटवर्तीय चोई यांना ४० दशलक्ष डॉलरची लाच दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या विलीनीकरणाला देशातील गुंतवणूकदारांचा मोठा विरोध होता. आपल्याला अनुकूल निर्णय मिळवण्यासाठी चोई यांच्या स्वयंसेवी संस्थेला देशातील विविध कंपन्यांनी ७० दशलक्ष डॉलरच्या देणग्या दिल्या होत्या. त्यापैकी ४० दशलक्ष डॉलर एकटय़ा सॅमसंगने दिले होते. याशिवाय चोई यांच्या मुलीला जर्मनीमध्ये घोडेस्वारीचे प्रशिक्षण घेण्यासाठी लाखो युरो पुरवल्याचा आरोपही सॅमसंगवर आहे. त्या प्रकरणी सॅमसंगचे अन्य एक पदाधिकारी, जे दक्षिण कोरियाच्या घोडेस्वारी संघटनेचे प्रमुखही आहेत, त्यांच्यावरही अटक वॉरंट जारी करण्याचे तपास अधिकाऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत.

गॅलॅक्सी नोट ७ या मोबाइल फोनमध्ये सदोष बॅटरी असल्याने सॅमसंगला नुकतीच ही फोन मालिका बाजारातून माघारी घ्यावी लागली होती. त्याने कंपनीचे मोठे नुकसान झाले होते. त्यातून सावरत असतानाच आता हा दुसरा मोठा धक्का बसला आहे. ली यांच्या अटकेने दक्षिण कोरियाच्या राजकीय व औद्योगिक वर्तुळात वादळ माजले आहे. दक्षिण कोरियाच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या (जीडीपी) एक पंचमांश उत्पन्न एकटय़ा सॅमसंग कंपनीचे आहे.