पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येच्या सनातन संस्था आणि हिंदू जनजागृती समितीने निषेध नोंदवला आहे. लंकेश यांच्या हत्येत आमच्या कोणत्याही कार्यकर्त्याचा सहभाग नाही, असे संस्थेने स्पष्ट केले आहे.

हिंदू आणि डाव्या संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या विचारधारेत मतभेद असू शकतात. ते नाकारू शकत नाहीत. पण म्हणून गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणात हिंदू कार्यकर्त्यांचा सहभाग आहे, असे म्हणणे चुकीचे आहे. सनातन संस्था लोकशाही मार्गाने वैचारिक लढाई लढते, असे सनातनचे प्रवक्ते चेतन राजहंस यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले. गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणाच्या चौकशीत सनातन संस्था विशेष चौकशी पथकाला सर्वतोपरी सहकार्य करेल, असेही राजहंस यांनी सांगितले. विशेष चौकशी पथकाकडून संस्थेच्या कोणत्याही कार्यकर्त्याची चौकशी करण्यात आली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. कोणत्याही पुराव्यांशिवाय गौरी लंकेश हत्या प्रकरणात हिंदू संघटनांचा सहभाग असल्याचा आरोप काही राजकीय नेते आणि उदारमतवादी लोक करत आहेत, असेही ते म्हणाले.

नक्षलवादी, जमीन वाद, कौटुंबिक वाद अथवा आर्थिक व्यवहारांतून लंकेश यांची हत्या झाली का? या दिशेने विशेष चौकशी तपास पथकाने तपास करण्याची गरज आहे, असे हिंदू विधिज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अॅड. संजीव पुनाळेकर यांनी सांगितले. आम्ही साधक आहोत. आतापर्यंत विशेष चौकशी पथकाच्या अधिकाऱ्यांनी संस्थेच्या कार्यालयांमध्ये येऊन चौकशी केलेली नाही. लंकेश हत्या प्रकरणात सर्वतोपरी सहकार्य करू, असे पुनाळेकर म्हणाले.