गेल्या २० दिवसांपासून कारागृहात असलेल्या तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांना शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. जयललिता यांना जामीन मंजूर केल्यामुळे संपूर्ण तामिळनाडूमध्ये त्यांच्या समर्थकांकडून दिवाळीआधीच दिवाळी साजरी करण्यात येत आहे. बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी कर्नाटकमधील विशेष न्यायालयाने जयललिता यांना दोषी ठरविले होते. त्यानंतर लगेचच त्यांची कारागृहात रवानगी झाली होती.
जयललिता यांनी त्यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षेविरोधात याचिका दाखल केली असल्यामुळे त्यांना जामीन मंजूर करण्यात यावा, असा युक्तिवाद त्यांचे वकील फली नरिमन यांनी सर्वोच्च न्यायालयात केला. त्यानंतर सरन्यायाधीश एच. एल. दत्तू यांच्या नेतृत्त्वाखाली पीठाने जयललिता यांच्यासह या खटल्यातील अन्य आरोपींनाही जामीन मंजूर केला. विशेष न्यायालयाच्या निकालाविरोधात याचिका दाखल करण्यासाठी सर्व आरोपींना दोन महिन्यांच्या कालावधी देण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी सर्वोच्च न्यायालयात १८ डिसेंबरला होईल.
याप्रकरणी उच्च न्यायालयात दाखल केल्या जाणाऱया याचिकांवर लवकरात लवकर सुनावणी घेण्यासाठी आपण कर्नाटक उच्च न्यायालयाला निर्देश देऊ, असेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. जयललिता यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षेमुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येऊ नये, यासाठी जयललिता स्वतः आपल्या कार्यकर्त्यांना सूचना देतील, असेही आश्वासन त्यांच्यातर्फे फली नरिमन यांनी न्यायालयाला दिले.