नोटाबंदीच्या निर्णयानंतर रोखीवर चालणारे अनेक व्यवहार बंद झाल्याचे चित्र देशभरात निर्माण झाले आहे. नोटाबंदीच्या निर्णयाचा फटका बसूनही अनेकजण या निर्णयाचे समर्थन करताना दिसत आहेत. या निर्णयामुळे केवळ मोठ्यांनाच नव्हे तर छोट्यांनाही हा त्रास सहन करावा लागत आहे.

नोटाबंदीनंतर गुरगावमधील छोट्या शाळकरी मुलांना आपल्या आवडत्या ‘फ्रुट ब्रेक’चा त्याग करावा लागणार आहे. नोटाबंदीमुळे गुरगावमध्ये लायन्स पब्लिक स्कुलच्या प्रशासनाने मुलांच्या खाऊसाठी साठवून ठेवलेले पैसे पालकांना परत केले आहे. ५०० रुपयाची एक नोट आणि एक अध्यादेश देऊन या शाळेनी त्यांची अनेक दिवसांपासून चालत आलेली एक आरोग्यदायी योजना बंद केली.

अप्पर आणि लोवर किंटर गार्टनमध्ये शिकणाऱ्या छोट्या मुलांना लहानपणापासून फळं खाण्याची सवय लागावी म्हणून शाळेच्या प्रशासनाने एक योजना सुरू केली होती. ज्यामध्ये वर्षाच्या सुरुवातीलाच पालकांकडून १३७५ रुपये घेतले जात असत. या पैशातून मुलांसाठी दररोज ताजी फळे आणली जात असे. हा पैसा दररोज खर्च होत असल्यामुळे त्याची नोंद शाळाखर्चात न करता एका स्वतंत्र खात्यामध्ये आम्ही करीत होतो अशी माहिती शाळेचे व्यवस्थापक राजीव कुमार यांनी दिली.

शाळेतील मुलांना योग्य पोषण मिळावे म्हणून प्रशासनाने फ्रुटब्रेकची संकल्पना मांडली होती. सुरुवातीला तुम्ही घरुन फळे आणि ती येथे ब्रेकमध्ये खा असे आम्ही म्हटले होते, असे कुमार म्हणाले. परंतु, आम्ही घरी फळे खात नाही किंवा रोज फळे आणायला जाणे जमणार नाही म्हटल्यावर शाळेने फळांसाठी पैसे जमा करुन ती वाटण्याचा निर्णय घेतला होता.

दर महिन्याला मुलांच्या फळांसाठी १२५ रुपये खर्च होत असे. रोज ताजी फळे आणण्याची व्यवस्था शाळेकडून केली जात असे. फ्रुटब्रेकमध्ये मुलांना फळे वाटली जात असे. उल्लेखनीय बाब म्हणजे ज्या मुलांना सुरुवातीला फळे खाण्याची आवड नव्हती ती मुलेदेखील अन्य मुलांकडून पाहून फळे खायला लागली होती.

लहान मुलांना ही आरोग्यदायी सवय लावण्यासाठी आम्हाला अनेक दिवस लागले होते. परंतु, निश्चलनीकरणानंतर दररोज ताजी फळे आणणे कठीण झाले आहे. शाळेने जमा केलेल्या पैशांमध्ये ५०० च्या आणि १००० च्या नोटांचा समावेश आहे. तेव्हा या नोटा बॅंकेमध्ये जमा करुन वेगळे खाते काढण्यापेक्षा या नोटा आम्ही पालकांना परत देण्याचा निर्णय घेतल्याचे कुमार यांनी म्हटले.

नवीन सत्र सुरू झाल्यानंतर सर्वांच्या हाती रोख पैसा येईल, त्यानंतरच ही योजना परत सुरू करण्यात येईल. पुढील शैक्षणिक सत्रात आम्ही ऑनलाइन व्यवहार करण्यावर भर देऊ अशी माहिती कुमार यांनी दिली. गुरगावमधील काही शाळांनी तर आत्तापासूनच ऑनलाइन व्यवहार करण्यास सुरुवात केली आहे. शाळेच्या स्नेह संमेलनासाठी या शाळांनी पालकांकडून ऑनलाइन देणगी स्वीकारली आहे.