मानवी नाळ व तिचा गर्भारपणातील उपयोग या विषयावर संशोधन सोपे व्हावे यासाठी वैज्ञानिकांनी एका चिपवर मानवी नाळेची निर्मिती केली आहे. या संशोधनात एका भारतीय वैज्ञानिकाचाही समावेश आहे. ही तयार करण्यात आलेली नाळ पोषकांचा पुरवठा गर्भाला कसा केला जातो हे समजण्यास उपयोगी आहे. अतिशय सूक्ष्मपातळीवर नाळेचा अभ्यास त्यामुळे शक्य आहे.
वेन स्टेट युनिव्हर्सिटीचे रॉबटरे रोमेरो यांनी सांगितले, की सध्या मानवी नाळेची जी प्रारूपे आहेत, त्यापेक्षा हे प्रारूप अधिक चांगले असून त्यामुळे गर्भारपणातील प्रक्रियांचे संशोधन सोपे होणार आहे. ही कृत्रिम नाळ वारंवार प्रयोग करण्यास उपयुक्त आहे व त्यामुळे नाळ संशोधनाचा खर्च कमी झाला आहे. आधी यात प्राण्यांच्या नाळेचा वापर केला जात होता.
नाळ ही आईकडून गर्भाकडे ज्या पदार्थाचे वहन होते त्यावर नियंत्रण करते. नाळेतूनच पोषके व ऑक्सिजन गर्भाला मिळत असतो व अनावश्यक घटक बाहेर टाकले जात असतात. जीवाणू, विषाणू व काही हानिकारक औषधे यांना गर्भापर्यंत पोहोचू न देण्याचे काम नाळ करीत असते. मानवी नाळ ही कार्ये कशा प्रकारे करते हे आता जास्त चांगले समजणार आहे. चिपवरील नाळ म्हणजे पेशीसदृश घटकाच्या पार पटलाने वेगळ्या केलेल्या दोन मार्गिका आहेत. पारपटलाच्या एका बाजूला फिटल एंडोथेलियल पेशी टाकल्या जातात व दुसऱ्या बाजूला आईच्या पेशी टाकल्या जातात. यात नाळेचा जो गाळणीसारखा वापर होतो व ऑक्सिजन तसेच पोषके वाढत्या गर्भास पुरवले जातात व त्याज्य पदार्थ बाहेर टाकले जातात तशीच क्रिया घडते, नाळेमुळे रोगजंतूंनाही अडवले जाते. वैज्ञानिकांनी आईच्या पेशींच्या बाजूने ग्लुकोज टाकून कृत्रिम नाळेची चाचणी घेतली. त्यात ग्लुकोज यशस्वी रीत्या दुसऱ्या बाजूला गेले. अशा चिपमुळे औषधांची चाचणीही करता येईल असे अमर बसू व मार्क मिंग चेंग या विद्युत व संगणक अभियांत्रिकीच्या सहायक प्राध्यापकांनी सांगितले.
एखादा अवयव चिपवर तयार करून सूक्ष्म रचनांच्या मदतीने त्याची नक्कल करायची ही पद्धत कमी खर्चिक आहे, त्यामुळे नवीन उपचार पद्धती विकसित करता येतील. ‘मॅटर्नल-फिटल अँड निओनॅटल मेडिसिन’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

फायदे
* गर्भाला पोषण मिळण्याची प्रक्रिया समजण्यास मदत
* कृत्रिम नाळ म्हणजे पारपटलाने वेगळ्या केलेल्या मार्गिका
* नवजात बालकांसाठी नवीन उपचारपद्धती विकसित करण्यात यश
नाळ संशोधनाचा खर्च कमी होणार