संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची धारणा सामान्यांना न्याय मिळावा हीच होती. परंतु कर्नाटक-महाराष्ट्रातील सीमाप्रश्न गेल्या ५६ वर्षांपासून प्रलंबित ठेवणाऱ्या न्यायपालिकांनी कुणासोबत न्याय केला, असा संतप्त प्रश्न विचारून शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी न्यायव्यवस्थेवर टीका केली. डॉ. आंबेडकरांच्या कार्याचा गौरव करताना खा. अरविंद सावंत यांनी भाषा-प्रांतवादावर कडाडून हल्ला चढविला. तामिळ खासदार त्यांच्या भाषेचा आग्रह धरतात. अन्य भाषिकदेखील अस्मिता बाळगतात. मग मराठीचा आग्रह धरणाऱ्या शिवसेनेला संकुचित का ठरविले जाते, असा प्रश्न सावंत यांनी विचारला.

सावंत म्हणाले की, ५६ वर्षे न्याय न देणे न्याय नाकारण्यासारखे आहे. न्यायपालिका आपली जबाबदारी योग्य रीतीने पार पाडत आहेत अथवा नाही, हे देखील तपासून पाहिले पाहिजे. निवडणूक आयोगावरदेखील सावंत यांनी अप्रत्यक्षपणे टीका केली.
मुंबईत दाखल झालेले बांगलादेशी, नेपाळी, पाकिस्तानी घुसखोरांनादेखील निवडणूक ओळखपत्र मिळाल्याचा आरोप त्यांनी केला. गजानन कीर्तिकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे छायाचित्र नोटेवर छापणे हीच खरी आदरांजली ठरेल, अशी मागणी केली.