केंद्र सरकारकडून काही दिवसांपूर्वी सरकारी गाड्यांवरील लाल दिव्यांवर बंदी घालण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. या निर्णयाला पश्चिम बंगालमधील टिपू सुलतान मशिदीचे शाही इमाम नुरूर रहमान बरकती यांनी आव्हान दिले आहे. आम्हाला ब्रिटीश सरकारच्या काळात गाडीवर लाल दिवा लावण्याची परवानगी मिळाली होती. त्यामुळे आता नरेंद्र मोदीही माझ्या गाडीवरील लाल दिवा काढू शकत नसल्याचे इमाम बरकती यांनी म्हटले आहे. मी एक शाही इमाम आहे. न्यायालयाने आदेश दिला असला तरी मी माझ्या गाडीवरचा लाल दिवा काढणार नाही. भारतात कम्युनिस्टांच्या काळापासून गाडीवर लाल दिवे लावले जात होते. तेव्हाही कुणी यावर आक्षेप घेतला नाही. त्यामुळे आताच्या सरकारला लाल दिव्यांवर बंदी आणण्याचा कोणताही अधिकार नाही. राजकीय नेते हे लोकांच्या घरी जाऊन मतांसाठी भीक मागतात. त्यामुळे त्यांना लाल दिव्याची गाडी वापरण्याचा अधिकारच नाही, असे इमाम बरकती यांनी सांगितले.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मला लाल दिव्याची गाडी वापरण्याची परवानगी दिल्याचा दावाही इमाम बरकती यांनी केला. आमच्या पाठिंब्यामुळेच सध्याचे सरकार सत्तेत आहे. ममता बॅनर्जी स्वत: लाल दिव्याची गाडी वापरत नाहीत. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत पश्चिम बंगाल वेगळे आहे. या ठिकाणी कायदे आणि नियम ठरवण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे. हा केंद्राचा  अधिकार नाही. राज्य सरकारने आम्हाला गाडीवरील लाल दिवा लावायची परवानगी दिली आहे. यासंदर्भात माझे ममता बॅनर्जी यांच्याशीही बोलणे झाले आहे. त्यामुळे आता स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मला गाडीवरील लाल दिवा काढायला सांगितला तर मी त्यांचे ऐकणार नाही, असे इमाम बरकती यांनी म्हटले.

यावेळी इमाम बरकती यांनी भारतामधील नियम आणि कायदे ब्रिटिशांनी तयार केल्याचे सांगितले. मला ब्रिटीश सरकारने लाल दिवा वापरायची परवानगी दिली होती. त्यामुळे सर्वप्रथम भारताला स्वत:चे कायदे तयार करण्याची गरज आहे, असे बरकती यांनी म्हटले. पश्चिम बंगालमधील भाजप नेते सी.के. बोस यांनी बरकती यांच्या वक्तव्यावर टीका केली आहे. बरकती हे देशद्रोही आहेत. त्यांना तात्काळ तुरूंगात टाकायला हवे, असे बोस यांनी म्हटले.