सुनंदा पुष्कर मृत्यूप्रकरणी तपास यंत्रणांना पूर्ण सहकार्य करणार असल्याचा पुनरूच्चार माजी केंद्रीय मंत्री शशि थरूर यांनी केला आहे. माझ्याकडे असलेली सगळी माहिती मी याआधीही तपास यंत्रणांना दिली होती, मात्र पुन्हा एकदा मी त्यांना सगळी माहिती द्यायला तयार आहे असंही थरूर यांनी स्पष्ट केलं आहे. सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूप्रकरणी झालेल्या सार्वजनिक चर्चेत भाग घेण्यास थरूर यांनी नकार दिला, मात्र त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही भूमिका मांडली आहे.

१७ जानेवारी २०१४ रोजी शशि थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांचा मृतदेह दिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये आढळला होता. या सगळ्या प्रकरणाचा तपास मागील तीन वर्षांपासून सुरू आहे. जे लोक प्रसिद्धी मिळवण्यासाठी किंवा चर्चेत राहण्यासाठी हे प्रकरण पुढे आणू पाहात आहेत त्यांना मी सहकार्य करण्याचा प्रश्नच येत नाही असं म्हणत थरूर यांनी भाजपच्या सुब्रमण्यम स्वामींना टोलाही लगावला आहे.

सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू संशयास्पदरित्या झाला असल्याची याचिका भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी कोर्टात दाखल केली आहे, याला आव्हान देणारी एक याचिका शशि थरूर यांचा सावत्र मुलगा शिव मेनन यानं शनिवारी कोर्टात दाखल केली आहे. सुब्रमण्यम स्वामी यांनी आपल्या याचिकेत या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशी न्यायलयाच्या देखरेखीखाली व्हावी अशी मागणी केली होती. मात्र आता याच याचिकेला मेनन यांनी कोर्टात आव्हान दिलं आहे.

माझ्या आईचा मृत्यू हा सार्वजनिक चर्चेचा विषय झाला याच्या मला वेदना होत आहेत असं शिव मेनन यांनी म्हटलं आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी सोमवारी म्हणजे २४ जुलै रोजी होणार आहे. सुब्रमण्यम स्वामी यांनी दाखल केलेली याचिका निव्वळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि चर्चेत राहण्यासाठी केली आहे असाही आरोप मेनन यांनी केला आहे.

सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूनंतर या प्रकरणाचा तपास बंद व्हावा म्हणून अनेक प्रयत्न झाले असा आरोप सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे. तसंच सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूला तीन वर्षे उलटूनही पोलिसांनी कोणालाच अटक का केली नाही? असाही प्रश्न स्वामी यांनी विचारला आहे. सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू विषप्रयोगामुळे झाल्याचं शवविच्छेदन अहवालात म्हटलं गेलं आहे याप्रकरणात अनेक मोठी नावं समाविष्ट असल्यानं त्यांना वाचविण्याचा प्रयत्न सातत्यानं होतो आहे असाही आरोप स्वामी यांनी केला आहे. आता याप्रकरणी तपासयंत्रणांना सहकार्य देण्याचं आश्वासन थरूर यांनी दिलं आहे. तरीही सुनावणी दरम्यान काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.