बोटी बुडून अनेक लोक दरवर्षी मृत्युमुखी पडत असतात, पण आता बोटींवर आघात झाल्यानंतरही त्या बुम्डणार नाहीत असे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. एका नवीन धातू संमिश्राचा वापर केला गेला असून, न्यूयॉर्क  युनिव्हर्सिटी ऑफ पॉलिटेक्निक स्कूल ऑफ इंजिनिअरिंग या संस्थेतील डीप स्प्रिंग्ज टेक्नॉलॉजी या संस्थेच्या वैज्ञानिकांनी तंत्र विकसित केले आहे. या संशोधन प्रकल्पात एका भारतीय वंशाच्या वैज्ञानिकाचाही समावेश आहे.
न बुडणाऱ्या या बोटीला हानी पोहोचली तरी ती बुडत नाही. तिला इंधनही कमी लागते, कारण ती कमी वजनाची असल्याने अवरोध कमी असतो. सिंटॅक्टिक फोम्स हे अनेक वर्षे आपल्याला माहीत आहेत, पण त्याचा उपयोग हलक्या धातू संमिश्रासाठी प्रथमच करण्यात आला आहे. या धातू संमिश्रात सिंटॅक्टिक फोमचे जाळे वापरले आहे. या बोटीची मजबुती वाढवण्यासाठी मॅग्नेशियमचे संमिश्र वापरले आहे व त्याला पोकळ सिलिकॉन कार्बाईड कणांची जोड दिली आहे, त्यांची घनता घनसेंटिमीटरला ०.९२ ग्रॅम आहे व पाण्याची घनता घनसेंटिमीटरला १ ग्रॅम आहे, त्यामुळे ही बोट पाण्यावर सहज तरंगते, कारण पाण्यापेक्षा तिची घनता कमी आहे. सागरी वातावरणातील अवघड स्थितीला ती तोंड देऊ शकते. येत्या तीन वर्षांत अशा न बुडणाऱ्या बोटींच्या उत्पादनास सुरुवात होईल.
 अल्ट्रा हेवी लिफ्ट अॅम्फीबियस कनेक्टर या उभयचर वाहनांची निर्मिती अमेरिकन सागरी दलाने केली आहे, त्या वाहनांमध्येही या कमी वजनाच्या तंत्राचा वापर करता येईल व नवीन सिंटॅक्टिक फोममुळे मिळणारा अधिक तरलतेचा फायदा घेता येईल.
तापमानाला टिकण्याची कसोटी
संशोधन संस्थेचे अभियांत्रिकी शाखेचे निखिल गुप्ता यांनी सांगितले, की धातू जास्त तापमानाला टिकणे हे फार महत्त्वाचे असते, कारण त्यापासून इंजिन व इतर सुटे भाग तयार केले जात असतात. सिंटॅक्टिक फोम मॅग्नेशियमच्या संमिश्राच्या जाळय़ापासून बनवतात. त्यात सिलिकॉन कार्बाईडचे पोकळ गोल कण मिसळतात. हा एक गोल कण दर इंचाला २५ हजार पौंड दाब सहन शकतो, त्यामुळे सिंटॅक्टिक फोमला संरक्षण मिळते, कारण प्रत्येक गोल हा ऊर्जा शोषून बोट फुटणार नाही याची काळजी घेत असतो. यात मॅग्नेशियम संमिश्राच्या जाळय़ात असे अनेक पोकळ गोल बसवून बोटीची मजबुती वाढवता येते.