व्यंगचित्रावरून समाजाच्या सदिच्छा गमावल्याचे नेत्यांना शल्य

शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’मध्ये आलेल्या वादग्रस्त व्यंगचित्रामुळे शिवसेनेच्या खासदारांना अस्वस्थतेने घेरले आहे. विशेषत: लोकसभेतील अठरापैकी तेरा खासदार मराठा समाजाचे असल्याने तर त्यांच्या तीव्र नाराजीची पक्षनेतृत्वाला गंभीर दखल घ्यावी लागणार असल्याचे दिसते आहे.

शिवसेनेच्या काही खासदारांशी अनौपचारिक चर्चा केल्यानंतर त्यांच्यातील अस्वस्थतेची तीव्रता लक्षात येते. मात्र, एकही खासदार उघडपणे बोलण्यास तयार नाही. ‘समाजाच्या भावना दुखावणारे व्यंगचित्र छापून आले, ही चूकच आहे. पण झालेल्या चुकीवर लगेचच पडदा का टाकला नाही? सुभाष देसाई यांच्याऐवजी स्वत: उद्धव ठाकरे यांनी पुढे येऊन खुलासा का केला नाही? माफी नको, पण किमान खेद तरी व्यक्त करायला हवा होता. ते पुढे आले असते तर विषय तापलाच नसता आणि आमच्यावर तोंड लपविण्याची वेळ आली नसती,’’ असे एक खासदार म्हणाला. ‘‘आमची गोची झाली आहे. जातीपुढे काही करता येत नाही. या व्यंगचित्राने गावोगावचा मराठा शिवसैनिक खूपच दुखावला आहे. मतदारांना तोंड आम्हाला द्यावे लागते. (मुंबईत बसलेल्यांचे) त्यांचे काय जाते?,’’ असेही तो स्पष्टपणे म्हणाला. हा खासदार मराठय़ांच्या मतांवरच निवडून येतो.

‘‘प्रस्थापित मराठा समाज कदाचित राष्ट्रवादी व काँग्रेसच्या बाजूने असेल; पण विस्थापित, गरीब मराठा समाज शिवसेनेशी जोडला आहे. मराठा समाजाच्या भव्य मोर्चाचा एकंदरीत सूर भाजपविरोधी होता. त्याचा फायदा शिवसेनेलाच झाला असता. पण या मोर्चेकरांना आम्ही आमच्याविरोधात उभे केले आहे. हा स्वयंचितचा प्रकार नव्हे, तर काय आहे?,’’ असा सवाल करून एक वरिष्ठ खासदार म्हणाला, ‘‘इतर मागासवर्गीयांच्या नव्हे, तर विस्थापित मराठय़ांच्या जिवांवर आमचे राजकारण चालते. इतर मागासवर्गीय व काही प्रमाणात दलित भाजपकडे वळत असताना आम्ही मात्र आमची हक्काची मतपेढी गमावत आहोत. भाजपला आनंदाच्या उकळ्या फुटत असतील.’’

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्याबाबत शिवसेना नेहमीच नरमाईची भूमिका का घेते, हा प्रश्न एका खासदाराला पडला आहे. ‘‘हे सर्व कारस्थान पवार करीत असतानाही त्यांच्याविरुद्ध बोलले जात नाही. ते मराठय़ांचे कैवारी नव्हे, तर वैरी असल्याचे ठामपणे सांगितले जात नाही,’’ अशा शब्दांत त्या खासदाराने आपली नाराजी व्यक्त केली.

बुलढाण्याचे खासदार प्रताप जाधव यांनी राजीनामा दिल्याच्या वृत्तावरून शिवसेनेमध्ये मोठी अस्वस्थता पसरली होती. जाधव रविवारपासून टोकाचे अस्वस्थ होते. अखेर त्यांच्यासह दोन आमदारांची समजूत काढण्यात नेतृत्व यशस्वी झाले असले तरी मराठा खासदारांमधील खदखद काही थांबलेली नाही. जाधव यांच्याबरोबरच मावळचे श्रीरंग बारणे, शिरूरचे शिवाजीराव आढळराव-पाटील, नाशिकचे हेमंत गोडसे, वाशिमच्या भावना गवळी आदींनी राजीनामे दिल्याच्या बातम्या सामाजिक माध्यमांमध्ये फिरत होत्या. या सर्व खासदारांनी त्याचे स्पष्ट खंडन केलेले आहे. बारणे यांनी तर पक्षनेतृत्वाच्या सल्लय़ावरून सायबर सेलकडे तक्रार केली आहे.