उत्तरप्रदेशमध्ये समाजवादी पक्षात यादव कुटुंबियांमध्ये सुरु असलेला कलह पुन्हा एकदा उफाळून आला आहे. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी मंत्रिमंडळातून चार मंत्र्यांची हकालपट्टी केली असून यात त्यांचे काका शिवपाल यादव यांचादेखील समावेश आहे. अमरसिंह यांनी कट केला असून अमरसिंहांच्या निकटवर्तीयांना माझ्या मंत्रिमंडळात स्थान मिळणार नाही असे अखिलेश यादव यांनी खडसावले आहे.

रविवारी लखनऊमध्ये मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी पक्षाच्या आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीत अखिलेश यांनी त्यांचे काका शिवपाल यादव यांच्यासह तीन मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिला आहे. तर पक्षाचे आमदार उदयवीर सिंह यांनाही सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. अखिलेश यादव यांनी हकालपट्टी केल्यावर शिवपाल यादव यांनी मुलायमसिंह यादव यांच्या निवासस्थानी धाव घेतली आहे. तर आम्ही अखिलेश यादव यांच्यासोबत काम करु, आम्हाला शिवपाल यादव नको अशी भूमिका पक्षातील आमदार विजय यादव यांनी मांडली आहे.

उत्तरप्रदेशमधील निवडणूक तोंडावर असताना समाजवादी पक्षाला कौटुंबिक कलहाने ग्रासले आहे. मुलायम सिंह आणि त्यांचे बंधू शिवपाल सिंह हे एका गटात आहेत. तर अखिलेश यादव, रामगोपाल यादव हे दुस-या गटात आहे. या वादाची ठिणगी अमरसिंह यांच्यामुळे पडल्याचे सांगितले जाते. अमरसिंह यांना सहा महिन्यांपूर्वीच पुन्हा समाजवादी पक्षात घेण्यात आले होते. अमरसिंह, शिवपाल यादव यांनी मुलायमसिंहांकडे अखिलेश यादव यांच्याविरुद्ध तक्रारींचा पाढा वाचला. त्यामुळे मुलायमसिंह यादव यांनी अखिलेश यांच्याऐवजी शिवपाल यादव यांची प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लावली. तर वडिलांनी केलेल्याा कारवाईमुळे चिडलेल्या अखिलेश यादव यांनीही बंडाचा पवित्रा घेतला. अखिलेश यादव यांनी शिवपाल यांच्याकडील महत्त्वाची खाती काढून घेतली. शेवटी मुलायम सिंह यांनी शिवपाल यादव यांची मनधरणी करत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. पण विधानसभा निवडणुकीत अखिलेश यादव हेच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील असे जाहीर केले. त्यामुळे शिवपाल यादव पुन्हा नाराज झाले आहेत. शिवपाल यादव यांनी बोलावलेल्या बैठकीत अखिलेश यादव गैरहजर होते. अखिलेश यादव यांचे सहकारी रामगोपाल यादव यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना थेट धमकीचे पत्रच दिले आहे. अखिलेश यादव यांचा विरोध करणारे विधानसभा निवडणूक बघू शकणार नाही असे धमकीचे पत्रकच रामगोपाल यादव यांनी काढले आहे.