४१ रुग्ण सापडल्याने प्रतिबंधात्मक उपाय सुरू

सिंगापूरमध्ये झिकाचे ४१ रुग्ण आढळले असून, त्यामुळे घबराट पसरली आहे. अधिकाऱ्यांनी संरक्षक सूट घालून कीटकनाशकांची फवारणी डासांचा प्रादुर्भाव असलेल्या भागात केली आहे.घरोघरी जाऊन त्यांनी फवारणी केली. राष्ट्रीय पर्यावरण संस्थेच्या निरीक्षकांनी उपनगरी जिल्हय़ात भेटी दिल्या व जेथे परदेशी बांधकाम कामगार राहतात तेथे तपासणी केली. तेथे डासांची पैदास वाढत असल्याचा संशय आहे. शेजारी देशांनी सिंगापूरमधून हा रोग त्यांच्याकडे पसरू नये यासाठी दक्षता घेतली आहे. त्यासाठी कीटकनाशकांची धुरळणी केली जात आहे. झिका रोगात अगदी सौम्य लक्षणे दिसतात. त्यात ताप, चट्टे यांचा समावेश असतो. ब्राझीलसह एकूण ५८ देशांत हा रोग आढळून आला आहे. गर्भवती महिलांच्या जन्माला येणाऱ्या बाळांमध्ये मेंदूची वाढ कमी झालेली दिसून येते. त्याला मायक्रोसेफली असे म्हणतात. सिंगापूर हे दाट लोकवस्तीचे बेट असून, तेथे नेहमी पाऊस पडत असतो. तेथे आधीच डेंग्यूचा उपद्रव असताना आता झिका पसरत आहे. एडिस एजिप्ती या डासामुळे झिका व डेंग्यू या दोन्ही रोगांचा प्रसार होतो. निरीक्षकांनी प्रसाधनगृहे तसेच पाण्याची डबकी यांची तपासणी केली. डासांना मारण्यासाठी पंपाने धुरळणी करण्यात आले. सिंगापूर सरकारने झिकाचे ४१ रुग्ण असल्याचे सांगितले असून, त्यातील ३६ परदेशी बांधकाम कामगार आहेत. संबंधित कामगारांची राहण्याची ठिकाणे अस्वच्छ असून त्यामुळे डासांची उत्पत्ती होत आहे असे सांगण्यात आले.