मानवी जीवन ‘स्मार्ट फोन’ आणि तत्सम उपकरणांमुळे वेगाने बदलत असताना तसेच शहरीकरणाच्या प्रक्रियेचा जोर वाढत असताना शहरेच स्मार्ट करण्याचे वेध मानवाला लागले आहेत. लवकरच शहरी रस्त्यांवरील दिव्यांची जागा झाडे घेतील. पण ही झाडे वैशिष्टय़पूर्ण असतील, अंधारात लख्खपणे उजळून निघणारी असतील, असे एका संशोधन अहवालात नमूद करण्यात आले आहे.
जगभरात पर्यावरणीय बदलांच्या शक्यता लक्षात घेत, उष्ण, समशीतोष्ण आणि शीत अशा तीनही कटिबंधातील लोकांसाठी उपयुक्त अशी शहरे कशी असावीत, यावर ब्रिटनस्थित एक संस्था संशोधन करीत होती. या संस्थेच्या वतीने ‘स्मार्ट’ शहरांविषयी तयार करण्यात आलेला आपला अहवाल अलीकडेच प्रकाशित केला. त्यामध्ये स्मार्ट शहरांची गरज, रचना, वैशिष्टय़े अशा बाबी अधोरेखित करण्यात आल्या़

जैविक बदल आणि पुनर्वापराची क्षमता
या स्मार्ट शहरांमध्ये जैविक बदल केलेली झाडे लावली जातील. हे बदल करताना झाडांकडून दिवसा उजेडी वापरली जाणारी प्रकाश ऊर्जा रात्री पुनर्वापरासाठी पुन्हा एकदा प्रकाश ऊर्जेत रूपांतरित करण्याची क्षमता विकासित करण्यात आली असेल. यामुळे मानवी आरोग्य अधिक निरामय तर होईलच शिवाय माणसांची आजारपणामुळे कामाला न येण्याची शक्यताही मावळू शकेल, असा दावा या संशोधनात करण्यात आला आहे.