२०११ मध्ये करण्यात आलेल्या सामाजिक, आर्थिक व जातिनिहाय जनगणनेत देशाच्या ग्रामीण भागातील विदारक परिस्थिती समोर आल्यानंतर शनिवारी काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींना टीकेचे लक्ष्य केले. मोदी हे देशातील गरिबांचा अपमान करत असून त्यांचे सुटाबुटातील सरकार फक्त श्रीमंत वर्गालाच केंद्रस्थानी ठेवून धोरणे आखत असल्याचा आरोप काँग्रेसने केला. मोदींचे गुजरात मॉडेल हे देशातील गरिबांसाठी हानीकारक आहे. ‘युनिसेफ’ या आंतरराष्ट्रीय संस्थेकडून यासंदर्भात प्रकाशित करण्यात आलेला अहवाल सरकारकडून दडपण्यात येत असल्याचेही काँग्रेस प्रवक्ते राजीव गौडा यांनी सांगितले. ‘युनिसेफ’च्या या अहवालात नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असलेल्या १२ वर्षांच्या कार्यकाळात विविध पातळ्यांवरील मानवी विकास निर्देशांकाच्या प्रगतीचे निष्कर्ष प्रकाशित करण्यात आले आहेत. त्यानूसार, मोदींच्या ‘कॉर्पोरेट इंडिया’ व्याख्येत न बसणाऱ्या गरीब, महिला, बालके आणि आदिवासी या प्रत्येक घटकाची दुरावस्था झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
सामाजिक, आर्थिक व जातिनिहाय जनगणनेच्या अहवालावर नजर टाकल्यास देशाच्या ग्रामीण भागात मोठ्याप्रमाणावर काम करण्याची गरज आहे. काँग्रेसच्या कार्यकाळात हरित क्रांती, धवल क्रांतीसारख्या उपक्रमांच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या विकासासाठी अनेक प्रयत्न करण्यात आल्याचा दावा राजीव गौडा यांनी केला. काही दिवसांपूर्वी मोदींनी लोकसभेतील भाषणादरम्यान, मनरेगा काँग्रेसच्या अपयशाचे थडगे असल्याची उपरोधिक टीका केली होती. मात्र, ग्रामीण भागासाठी दिशादर्शक असलेल्या या योजनेची खिल्ली उडवून मोदींनी गरिबांचा अवमान केला आहे. ग्रामीण भागातील गरिबात गरीब वर्गासाठी ही योजना सामाजिक सुरक्षा उपलब्ध करून देत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.