अर्थविवंचनेत असलेल्या ‘स्पाइसजेट’ हवाई प्रवास कंपनीची सेवा इंधनाअभावी ठप्प पडली आहे.. तेल कंपन्यांनी उधारावर इंधन पुरविण्यास नकार दिल्याने स्पाइसजेटच्या एकाही विमानाचे बुधवारी उड्डाण होऊ शकलेले नाही.
तेल कंपन्यांनी स्पाइसजेटकडून आधीची थकबाकी रक्कम देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे स्पाइसजेटला इंधनाचा पुरवठा होऊ शकलेला नाही. याआधी वेळापत्रकानुसार ठरलेली उड्डाणे परस्पर रद्द केल्याप्रकरणी गेल्याच आठवड्यात कंपनीवर महिन्याभराच्या प्रवासासाठीच आगाऊ नोंदणी करण्याची मुभा देण्यात आली होती. कंपनीच्या ताफ्यातील विमाने आणि तिचा उड्डाण वेळापत्रक याबाबत म्हणणे मांडण्याचे आदेश नागरी हवाई महासंचालनालयाने दिले होते. याबाबत कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी संबंधित विभागातील अधिकाऱयांशी चर्चा करुन कंपनीला साहाय्य कऱण्याची विनंतील केली. स्पाइसजेटचे मुख्य कार्यचलन अधिकारी संजीव कपूर, मुख्य प्रवर्तक सन समूहाचे मुख्य वित्तीय अधिकारी एस.एल.नारायण यांनी केंद्रीय नागरी हवाईमंत्री अशोक गजपती राजू आणि महासंचालक प्रभात कुमार यांनी भेट घेतली होती. याबाबात संचालनालयाने मंगळवारी उशिरा कंपनीवरील महिन्याचे तिकीट नोंदणी निर्बंध मागे घेत मार्च २०१५ पर्यंत नोंदणी करण्याची परवानगी देत दिलासा दिला. परंतु, आता तेल कंपन्यांनीच इंधन देण्यास नकार दिल्याने ‘स्पाइसजेट’चे संकट आणखी वाढले आहे.