भारतीय वंशाची अठरा वर्षांची मुलगी श्रुती पलनियप्पन डेमोक्रॅटिक पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात सर्वात कमी वयाची प्रतिनिधी बनली आहे. हिलरी क्लिंटन यांची अध्यक्षपदासाठी उमेदवारी ज्या अधिवेशनात जाहीर करण्यात आली, त्यात तिला पक्षाचे सदस्यत्व मिळाले आहे. सेडर रॅपिड्स येथील श्रुती पलनियप्पन असे तिचे नाव असून ती हार्वर्ड विद्यापीठाची विद्यार्थिनी आहे. हिलरी क्लिंटन यांची ती मोठी समर्थक असून डेमोक्रॅटिक पक्ष हा महिलेला उमेदवारी देणारा अमेरिकेतील पहिला राजकीय पक्ष ठरला आहे. श्रुतीचे वडील पलनिय्यपन हे डेमोक्रॅटिक पक्षाच्या अधिवेशनास उपस्थित होते. श्रुती पलनियप्पन ही डेमोक्रॅटिक पक्षाची सर्वात लहान वयाची प्रतिनिधी बनल्याने माध्यमांचे लक्ष तिच्याकडे वेधले गेले आहे. अ‍ॅरिझोनातील १०२ वर्षे वयाच्या प्रतिनिधी जेरी एमेट या सर्वाधिक वयाच्या आहेत. श्रुतीने मंगळवारी सर्वात लहान वयाची प्रतिनिधी म्हणून मान पटकावला, तेव्हा एक इतिहास घडला. आयोवाचे प्रतिनिधित्व करण्याचा मान तिला रोल कॉल मतांच्या माध्यमातून मिळाला आहे. आयोवाचे प्रतिनिधित्व करण्याची जी संधी सभापतींनी दिली त्याबद्दल मी आभारी आहे, असे श्रुतीने सांगितले. देशाच्या अध्यक्षपदासाठी आमच्या पक्षाच्या उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्याच्या प्रक्रियेत संधी मिळाली ही मोठी गोष्ट आहे, असे तिने आनंद व्यक्त करताना स्पष्ट केले. हिलरी क्लिंटन यांच्या रूपाने पहिली महिला अध्यक्ष उमेदवार निवडून आमच्या पक्षाने इतिहास घडवला, असे तिने फेसबुक पोस्टवर म्हटले आहे. पक्षाचे प्रतिनिधी म्हणून निवड होणे ही लांबलचक प्रक्रिया आहे पण मला ती सहज पार करता आली. अमेरिकन ड्रीम म्हणजे अमेरिकेचे स्वप्न हे कुठल्याही भिंती नकोत हे आहे, अशा आशयाचे जे भाषण अध्यक्ष बराक ओबामा यांनी केले होते त्यामुळे ती प्रभावित झाली आहे. ‘तुमच्या आवाजातूनच तुम्ही शुद्ध भावना व्यक्त केल्या, तुमच्या शब्दांनी मी हेलावून गेले आहे, हिलरी क्लिंटन अध्यक्ष व टिम कायने उपाध्यक्ष झाले, तरी त्यांच्या कारकीर्दीवरही ओबामा यांच्या वारशाची छाप राहील,’ असे तिने सांगितले. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव करण्यासाठी एकजूट केली पाहिजे, ट्रम्प निवडून आले तर देश अनेक पावले मागे जाईल, अशी भीती तिने व्यक्त केली आहे.