नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित २५ गोपनीय फाइल्स खुल्या करतानाच, राष्ट्रीय राजधानीत नेताजींचे स्मारक उभारण्यात येईल, अशी घोषणा सरकारने शुक्रवारी केली.
खुल्या करण्यात आलेल्या अवर्गीकृत दस्ताऐवजांमध्ये १९५६ ते २००९ या कालावधीतील पंतप्रधान कार्यालय व गृहमंत्रालयातील प्रत्येकी ५ फाइल्स, तर परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातील १५ फाइल्सचा समावेश आहे.
विशेषत: युवकांसह देशातील लोकांना नेताजींचे जीवन व त्यांचे स्वातंत्र्यलढय़ातील योगदान यांच्याबद्दल जाणून घेण्याची इच्छा आहे. त्यामुळे ही मोठी उपलब्धी आहे, असे या फाइल्स खुल्या केल्यानंतर केंद्रीय सांस्कृतिकमंत्री महेश शर्मा म्हणाले. अनेक संस्था आणि खासदार यांची मागणी विचारात घेऊन सरकारने नेताजींचे जीवन व त्यांचा स्वातंत्र्यलढा प्रदर्शित करणारे एक भव्य स्मारक नवी दिल्लीत बांधण्याचा निर्णय घेतला असून, या स्मारकाचे काम सुरू झाले आहे असेही शर्मा यांनी सांगितले.
नेताजींच्या जीवनाशी संबंधित दोन फाइल्स खुल्या करण्यास जपाननेही संमती दिली आहे. तथापि, त्यांच्या ताब्यातील इतर तीन फाइल्सबद्दल असे कुठलेही आश्वासन मिळालेले नसल्याचे शर्मा म्हणाले. जपान दोन फाइल्स देण्यास तयार असल्यामुळे आम्ही याबाबत त्यांच्याशी बोलणी करू. यामुळे नेताजींच्या जीवनाबाबत संशोधन करणाऱ्यांना अधिक माहिती मिळू शकेल. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनाशी संबंधित १०० फाइल्सवर संवर्धनासाठी प्राथमिक प्रक्रिया व त्यांना डिजिटल स्वरूपात आणल्यानंतर या फाइल्स २३ जानेवारीला सार्वजनिक करण्यात आल्या होत्या, तर ५० फाइल्सचा दुसरा लॉट २९ मार्चला खुला करण्यात आला होता.