पाकिस्तान आणि झिम्बाब्वे यांच्यामध्ये शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यादरम्यान गडाफी स्टेडियमबाहेर आत्मघातकी हल्ला करण्यात आला. यावेळी स्वत:ला स्फोटकांनी उडवून देणाच्या प्रयत्नात असलेल्या व्यक्तीला अडवताना एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. तब्बल सहा वर्षांनंतर एखादा परदेशी क्रिकेट संघ पाकिस्तानमध्ये खेळण्यास राजी झाला होता. मात्र या आत्मघातकी हल्ल्यामुळे पाकिस्तानात क्रिकेट खेळायचे की नाही, यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
लाहोर येथील गडाफी स्टेडियममध्ये शुक्रवारी पाकिस्तान- झिम्बाब्वे यांच्यातील सामना प्रकाशझोतात खेळविण्यात येत होता. त्यावेळी रात्री ९ च्या सुमारास रिक्षा चालविणाऱ्या एका व्यक्तीने कमला चौक परिसरात स्वत:ला स्फोटकांनी उडवून दिले. कमला चौक आणि गडाफी मैदान यांच्यात एक किलोमीटरपेक्षा कमी अंतर आहे.
पाकिस्तानचे केंद्रीय मंत्री परवेज राशिद यांनी या आत्मघातकी हल्ल्याबाबत माहिती दिली. २००९ मध्येही श्रीलंकन संघाच्या सामन्यादरम्यान दहशतवादी हल्ला झाला होता. त्यानंतर परदेशी क्रिकेटसंघांनी पाकिस्तानात खेळण्यास नकार दिला होता. त्यानंतर तब्बल सहा वर्षांनंतर झिम्बाब्वे संघ पाकिस्तानात खेळण्यास गेला होता. मात्र आताही आत्मघातकी हल्ल्याची घटना घडली आहे.
‘द डॉन’च्या वृत्तानुसार, लाहोर स्टेडियमच्या बाहेर कलमा चौकेवर रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास आत्मघातकी हल्ला झाला. परवेज राशिद यांनी ‘द डॉन’शी बोलताना सांगितले की, आत्मघातकी हल्ल्याला रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याचा या स्फोटात मृत्यू झाला आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने या आत्मघातकी हल्ल्याच्या वृत्ताला दाबण्याचा प्रयत्न केला. स्फोट वीजेच्या ट्रॉन्सफॉर्मरमध्ये झाल्याचं क्रिकेट बोर्डाकडून सांगण्यात आलं. हल्ल्याच्या परिसरात लोकांना आणि माध्यमांना जाण्यास क्रिकेट बोर्डाकडून मनाई करण्यात आली. मात्र काही वेळाने हे स्पष्ट झाले की, हा आत्मघातकी हल्ला आहे.
पाकचे केंद्रीय मंत्री परवेज राशिद यांनी पाकिस्तानच्या ब्रॉडकास्टर्स असोसिएशनचे आभार मानले. कारण त्यांनी ही बातमी तातडीने दाखवली नाही. स्फोट होताच क्षणी बातमी प्रसारित झाली असती, तर स्टेडियममध्ये गोंधळ उडाला असता.