सुकमामधील नक्षली हल्ल्यामागे नक्षली कमांडर मडवी हिडमा याचा हात असल्याची चर्चा सुरु झाली आहे. या हल्ल्याप्रकरणी आत्तापर्यंत हाती लागलेल्या पुराव्यांवरुन संशयाची सूई हिडमाकडे वळली आहे. हिडमा हा फक्त २५ वर्षांचा आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नक्षलवादाचा नि:पात करु अशी गर्जना केली असली तरी सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी सोमवारी रक्तपात घडवला होता. या हल्ल्याचा तपास करणाऱ्या सुरक्षा यंत्रणातील अधिकाऱ्यांनी नक्षली कमांडर मडवी हिडमा उर्फा हिडमन्ना हा या हल्ल्याचा सूत्रधार असावा असा संशय व्यक्त केला आहे. ‘इंडिया टुडे’ने हे वृत्त दिले आहे. हिडमा हा स्थानिकांमध्ये संतोष आणि हिडमालू या नावाने सुद्धा कुप्रसिद्ध आहे. गेल्या काही वर्षांपासून हिडमाने या भागात स्वतःची दहशत निर्माण करण्यात यश मिळवले आहे. या भागातील मोस्ट वाँटेड नक्षलवाद्यांच्या यादीत त्याचाही समावेश आहे. हिडमावर पोलिसांनी २५ लाख रुपयांचे इनाम जाहीर केले आहे.

हिडमाकडे बस्तरची जबाबदारी असून गेल्या पाच वर्षांत अनेक चकमकींमध्ये तो सुरक्षा दलाला चकवा देण्यात यशस्वी ठरला होता. २० मे २०१३ मध्ये जीराम घाटीमधील नक्षली हल्ल्यातही त्याचा सहभाग होता. या हल्ल्यात काँग्रेसच्या नेत्यांसह काही जवानांचा मृत्यू झाला होता. याशिवाय अनेक हल्ल्यांमध्ये त्याचा हात असल्याचा आरोप आहे. पीपल्स लिबरेशन गोरिल्ला आर्मीच्या बटालियन १ चा तो कमांडर आहे. या बटालियन अंतर्गत नक्षलवाद्यांचे तीन युनिट काम करतात. सुकमा आणि बिजापूर हा भागही या बटालियन अंतर्गत येतो. सध्या हिडमा हा बुर्कापाल आणि चिंतागूफामधील दुर्गम भागात लपून बसल्याची माहिती आहे. पण त्याचा नेमका ठावठिकाणा मिळत नसल्याने त्याचा शोध घेण्यात अडचणी येतात. हा भाग ओदिशा आणि आंध्र प्रदेशच्या सीमेवर असल्याने पोलिसांच्या अडचणी वाढतात असे जाणकारांचे मत आहे. एका राज्यात हल्ला केल्यावर दहशतवादी दुसऱ्या राज्यात जाऊन लपतात याकडे अनेकांनी लक्ष वेधले आहे. सुकमामधील हल्ल्यानंतर आता हिडमाचा शोध वेगात सुरु असून हिडमाला रोखण्याचे आव्हान आता सुरक्षा यंत्रणांसमोर आहे.