गेल्या काही दिवसांपासून रूग्णालयात दाखल असलेल्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्यावरील मूत्रपिंड (किडनी) प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी झाली. एम्सच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही शस्त्रक्रिया सुमारे ५ तास चालली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुषमा स्वराज यांना किडनी दान करणारा त्यांचा नातेवाईक नसल्याचे समजते.

या शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांच्या ताफ्यात एम्सचे संचालक एम.सी. बन्सल, व्ही. के. बन्सल आणि संदीप अग्रवाल यांच्यासह अनेक प्रख्यात डॉक्टरांचा समावेश होता. शनिवारी सकाळी ९ वाजता शस्त्रक्रियेस सुरूवात झाली. ही शस्त्रक्रिया दुपारी २.३० पर्यंत चालली. शस्त्रक्रियेनंतर सुषमा स्वराज यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आले.

दरम्यान, किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यापूर्वी किडनी दात्याची सर्व तपासणी करण्यात आली होती. सुषमा स्वराज या मधुमेहग्रस्त आहेत. किडनी निकामी झाल्यानंतर त्यांना डायलिसिसवर ठेवण्यात आले होते. स्वराज यांचे एका आठवड्यात तीन वेळा डायलिसिस करण्यात आल्याची माहिती एका डॉक्टरने दिली. गत १६ नोव्हेंबर रोजी सुषमा यांनी ट्विट करून किडनी निकामी झाल्यामुळे आपल्याला एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती दिली होती.