पत्रकार वेद प्रताप वैदिक यांनी जमात उद दवाचा म्होरक्या दहशतवादी हाफिज सईद याची पाकिस्तानात भेट घेतल्याची माहिती तेथील भारतीय दूतावासाला नव्हती, अशी माहिती परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी गुरुवारी लोकसभेत दिली. वैदिक यांनी पाकिस्तानातील भारतीय दूतावासाला कोणतीही माहिती न देता परस्पर सईद याची भेट घेतल्याचे स्पष्टीकरण सुषमा स्वराज यांनी दिले.
शून्य काळात कॉंग्रेसचे लोकसभेतील नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी हा विषय उपस्थित करीत परराष्ट्रमंत्र्यांनी या प्रकरणावर सभागृहाला माहिती द्यावी, अशी मागणी केली. त्यानंतर सुषमा स्वराज यांनी लगेचच लोकसभेत येऊन निवेदन सादर करीत खर्गे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर दिले. दरम्यान, वैदिक यांनी सईदची भेट घेतल्याचा आता राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (एनआयए) तपास करण्यात येण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. वैदिक यांच्या या भेटीविरुद्ध देशातील न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आल्या आहेत.