स्वित्झरलंड देशाने काळ्या पैशांची माहिती दिली नाही तर भारत व इतर देश गुन्हेगारी स्वरू पाची कारवाई त्या देशावर करणार असून त्या भीतीने आता स्वित्झरलंडने काळ्या पैशाबाबत देखरेख व अंमलबजावणी कारवाई वाढवली आहे. त्यांच्या बँकिंग व्यवस्थेला काळ्या पैशापासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. स्वित्झरलंडमध्ये गुंतवलेला काळा पैसा आता तेथील अर्थसंस्थांतून काढून घेतला जात आहे.
 त्या संस्थांच्या अनेक ग्राहकांनी कर भरलेला आहे की नाही याबाबत माहिती नाही असे स्वीस फायनान्शियल मार्केट सुपरवायजरी अ‍ॅथॉरिटी (फिनमा) या संस्थेने म्हटले आहे. ही संस्था तेथील काळ्या पैशांच्या व्यवहारांवर नियंत्रण ठेवण्यास जबाबदार आहे. स्वित्झरलंड आता भारत व इतर देशांशी करांच्या मुद्दय़ावर द्विपक्षीय संबंध सुधारण्यास इच्छुक आहे कारण स्वीस बँकांना वेगवेगळ्या न्याय क्षेत्रात नियंत्रण कारवायांना तोंड द्यावे लागत आहे. काळ्या पैशांवर नियंत्रणासाठी त्या देशावर अनेक देशांचा दबाव वाढला आहे.
 जर्मनी, फ्रान्स, बेल्जियम, अर्जेटिना  यांनी अमेरिकेपाठोपाठ त्या देशात गुन्हेगारी स्वरूपातील चौकशी सुरू केली असून भारत व इस्रायल या देशांनीही आता तसेच करण्याचा इशारा दिला आहे.  
स्वित्र्झलडमधील काळ्या पैशाचा शोध सुरू असतानाच काही आंतरराष्ट्रीय अहवालांमुळे जीनिव्हातील एचएसबीसी बँकेत काळा पैसा मोठय़ा प्रमाणावर असल्याचे सूचित झाले होते. आमची संस्था देखरेखीचे काम करीत असून बँकांनी कुठलीही कायदेशीर जोखीम घेऊ नये यासाठी प्रयत्नशील आहे असे फिनमाने म्हटले आहे.
काही ग्राहकांनी त्यांच्या मूळ देशात स्वयंप्रेरणेने मालमत्ता जाहीर केली आहे तर काही ग्राहक काळा पैसा काढून घेत आहेत. २०१७-१८ या वर्षांत स्वित्झरलंड व भारत यांच्यात काळ्यापैशाच्या माहितीची देवाणघेवाण करणारी यंत्रणाच सुरू होणार असल्याने सगळ्यांचे धाबे दणाणले असून काळा पैसा आता त्या देशाबाहेर जात आहे.