स्वीस बँकांमधील काळा पैसा लवकरच भारतात आणला जाण्याची शक्यता आहे. करांमधून मुक्तता मिळवण्यासाठी परदेशी बँकांमधून पैसा ठेवणाऱ्या भारतीयांची यादी रविवारी स्वित्र्झलड सरकारने तयार केली असून ती केंद्र सरकारकडे सोपवली जाईल. मोदी सरकराने नेमलेल्या विशेष तपास पथकाने अशा संशयास्पद खात्यांची तपासणी करून कायदेशीर कारवाईसाठी कंबर कसली आहे.
करचुकवेगिरी करणाऱ्यांचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्वित्र्झलड सरकारने बँकांत पैसे ठेवलेल्या काही खात्यांची कसून चौकशी केली. यात ज्यांनी करातून मुक्तता मिळवण्यासाठी पैसा आपल्या देशात आणून ठेवला आहे, त्यांची एक यादी आम्ही तयार केली आहे. ती लवकरच भारताकडे सोपवली जाईल, असे स्वित्र्झलड सरकारने सांगितले.यासाठी प्रशासकीय साह्य़, तसेच खातेदारांची बारीकसारीक माहितीही पुरवले जातील, असेही स्पष्ट करण्यात आले.
स्वीस बँकामधील काळा पैसा भारतात आणण्यासाठी एक समिती माजी न्या. एम. सी. शहा यांच्या नेतृत्वाखाली नेमली आहे. ज्या भारतीयांचा आणि कंपन्यांचा काळा पैसा स्वित्र्झलडमधील बँकांत आहे, तो आता स्वीस अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली आला असून, निधीचे मालक व फायदा मिळणारे लोक नेमके कोण आहेत याची तपासणी तेथील बँकांत सुरू करण्यात आली आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. नेमक्या कुठल्या भारतीयांचा काळा पैसा तेथे आहे हे सांगण्यास अधिकाऱ्याने मात्र या वेळी नकार दिला.
‘सगळाच पैसा काळा नाही’
स्वीस बँकेत ट्रिलियन डॉलर्सच्या घरात भारतीयांचा काळा पैसा आहे, हा तपशील खरा नाही, परंतु अलीकडे स्वीस नॅशनल बँकेने दिलेल्या आकडेवारीत २८३ बँकांत परकीयांचे १.६ ट्रिलियन डॉलर पडून आहेत. भारतीयांनी स्वीस बँकेत पैसे ठेवण्याचे प्रमाण १४,००० कोटींनी वाढल्याबाबत विचारले असता हा अधिकारी म्हणाला, की भारतीय म्हणून जाहीर केलेल्या व्यक्तींचा हा पैसा आहे. हा पैसा गैरमार्गाने मिळवला असण्याची शक्यता कमी आहे. तरीही भारताला काळय़ा पैशाबाबत वेळोवेळी माहिती दिली जाईल. याआधीही अशी माहिती आम्ही दिली होती, परंतु ती काही बँकांमधून चोरलेल्या यादीवरून किंवा फुटलेल्या माहितीवर आधारीत होती, पण त्यातील माहितीपेक्षा आमची माहिती अधिक विश्वासार्ह आहे, असा दावा या अधिकाऱ्याने केला.