सीरियातील रक्का शहराजवळ अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात ४२ नागरिकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये १९ लहान मुले आणि १२ महिलांचा समावेश आहे. गेल्या ८ दिवसांत हवाई हल्ल्यात सुमारे १६७ नागरिकांनी जीव गमावला आहे.

सीरियातील रक्कामध्ये आयसिसच्या तळांवर सीरिया, रशिया आणि अमेरिकन सैन्याचे हवाई हल्ले सुरु आहेत. मात्र हे हवाई हल्ले सर्वसामान्यांच्या जिवावर बेतू लागले आहेत. सोमवारी रक्का शहराजवळ अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात ४२ नागरिकांचा मृत्यू झाला. या वृत्तावर अमेरिकेच्या सुरक्षा दलाच्या प्रवक्त्यांनी अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र सीरियात काम करणाऱ्या समाजसेवी संस्थांनी या वृत्ताला दुजोरा दिला.

इराकमध्ये आयसिसचा पराभव केल्यानंतर आता सीरियातील आयसिसविरोधातील लढा तीव्र झाला आहे. रक्कामधून आयसिसला हद्दपार करण्यासाठी कुर्दीश आणि अरब सैन्याचे जवान लढा देत आहेत. आत्तापर्यंत रक्कामधील ६० टक्के  परिसर आययसिसपासून मुक्त करण्यात आला आहे. रक्कामध्ये आयसिसचे सुमारे २ हजार दहशतवादी अजूनही सक्रीय असल्याचे समजते. मात्र आता रक्कामधील ज्या भागात युद्ध सुरु असून तो भाग निवासी परिसर असल्याने सर्वसामान्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. हवाई हल्ल्यांमध्ये नागरिक राहत असल्याने इमारतींना फटका बसू लागला आहे. तर हवाई हल्ल्यात निवासी भाग लक्ष्य होऊ नये याची दक्षता घेतली जात असल्याचे अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणांनी म्हटले आहे. संयुक्त राष्ट्राच्या माहितीनुसार रक्का आणि परिसरात २५ हजार नागरिक अडकल्याचे वृत्त आहे.