होम्स शहरातील सुरक्षा दलाच्या दोन तळांवर आत्मघातकी बॉम्बस्फोट

सीरियातील तिसऱ्या क्रमांकाच्या होम्स शहरात सुरक्षा दलांच्या दोन तळांवर करण्यात आलेल्या आत्मघातकी हल्ल्यांमध्ये एका उच्चस्तरीय गुप्तचर संस्थेच्या प्रमुखासह ४२ लोक ठार झाले असून यामुळे जीनिव्हात होऊ घातलेली शांततेची बोलणी धोक्यात आली आहेत.

सीरियाचे अध्यक्ष बशर अल-असद यांचे विश्वासू सहकारी असलेले जनरल हसन दाबुल यांना लक्ष्य ठरवून झालेल्या या ‘नेत्रदीपक’ विजयाची जबाबदारी  पूर्वी अल-कायदाशी संलग्न असलेल्या सीरियातील फतेह अल-शाम आघाडीने घेतली आहे.

बॉम्बर्सनी अत्यंत संरक्षित अशा घौटा व महाट्टा भागातील देशाच्या सुरक्षा व लष्करी गुप्तचर विभागाच्या मुख्यालयाला लक्ष्य बनवून केलेल्या या आत्मघातकी हल्ल्यात ४२ लोक ठार झाल्याचे ‘सीरियन ऑब्झव्‍‌र्हेटरी फॉर ह्य़ूमन राईट्स’ या संस्थेने सांगितले. हल्ल्यात ३० लोक ठार व २४ जखमी झाल्याची माहिती प्रांतिक गव्हर्नर तलाल बराझी यांनी दिली.

आत्मघातकी बॉम्बर्सपैकी एकाने गुप्तचर प्रमुख दाबुल यांना विशेषकरून लक्ष्य केले होते असे सांगून, दाबुल हे या हल्ल्यात मरण पावल्याच्या वृत्ताला सरकारी दूरचित्रवाहिनीने दुजोरा दिला. या बॉम्बर्सनी गुप्तचर अधिकाऱ्यांशी बराच काळ बंदुकीने लढाई केल्यानंतर स्वत:ला उडवून दिले. ही चकमक दोन तास चालल्याचे या संस्थेचे प्रमुख रामी अब्देल रहमान म्हणाले.