सायरस मिस्त्रींना टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरुन हटवल्यानंतर सुरु झालेला वाद काही शमण्याची चिन्हे नाहीत. टाटा समूहाने राष्ट्रीय कंपनी कायदा लवादासमोर कॅव्हेट दाखल केल्याने आता मिस्त्री विरुद्ध टाटा असा कायदेशीर लढा रंगण्याची चिन्हे आहेत. सायरस मिस्त्री यांनीही सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखल केल्याची चर्चा होती. पण सायरस मिस्त्री यांच्या कार्यालायने हे वृत्त फेटाळून लावले आहे.

सोमवारी टाटा समूहाची जबाबदारी असलेल्या टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरुन सायरस मिस्त्री यांना हटवण्यात आले होते. रतन टाटा यांच्यानंतर अध्यक्षपदी विराजमान झालेल्या सायरस मिस्त्री यांना अवघ्या चार वर्षातच अध्यक्षपदावरुन पायउतार व्हावे लागल्याने सर्वांनाच धक्का बसला होता. टाटा समूहात मुख्य प्रवर्तक टाटा ट्रस्टचा ६६ टक्के हिस्सा आहे. तर १८.४ टक्क्यांसह शापूरजी पालनजी ही दुसरी मोठी भागीदार कंपनी आहे.  पालनजीचे मुख्य प्रवर्तक शापूरजी पालनजी हे सायरस मिस्त्री यांचे वडिल आहेत. मिस्त्री यांना हटवल्यानंतर शापूरजी पालनजीने टाटा समूहाच्या कारवाईवर आक्षेप घेतला होता. या पार्श्वभूमीवर टाटा यांच्यावतीनेही कंपनी लवादासमोर कॅव्हेट दाखल करण्यात आले. टाटा सन्स, रतन टाटा आणि सर दोराबजी टाटा ट्रस्टतर्फे लवादाकडे मिस्त्रींविरोधात कॅव्हेट दाखल करण्यात आले आहे.

मिस्त्री यांच्या गच्छंतीनंतर रतन टाटा यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. स्थैर्य आणि सातत्याअभावी समुहाच्या कामात कोणतीही पोकळी निर्माण होऊ नये यासाठी मी हंगामी अध्यक्षपद स्विकारले असे टाटा यांनी सांगितले. हा कालावधी अत्यंत लहान असेल. लवकरच कायमस्वरूपी नव्या नेतृत्त्वाची नियुक्ती केली जाईल, असेही टाटांनी स्पष्ट केले होते.

सोमवारी झालेल्या बैठकीत टाटा सन्सच्या एकुण ९ संचालकांपैकी ८ सदस्यांनी मतदान केले होते. यापैकी सहाजणांनी सायरस मिस्त्री यांच्याविरोधात तर दोनजण तटस्थ राहिले.  त्यामुळे मिस्त्री यांना हटवण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला नाही असा दावा पालनजी समूहाने केला आहे.