कानपूरच्या दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये शिकणाऱ्या एका मुलाने झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. एकाही विद्यार्थ्याला माझ्याशी बोलू दिले जात नव्हते, मला शिक्षक कायम ओरडत आणि टोमणे मारत. मी दोन महिन्यांपूर्वी शाळेत प्रवेश घेतला तेव्हापासून माझ्याशी एकाही विद्यार्थ्याने संवाद साधला नाही. मला कायम टोमणे मारले जायचे असा आरोप या विद्यार्थ्याने ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेशी बोलताना केला.

तुझ्या शाळेच्या दप्तरात बंदूक आहे असे सांगून माझ्या मुलाचे दप्तर तपासले जाई असा आरोप पीडित मुलाच्या आईने केला आहे. तसेच इतर विद्यार्थी कायम त्याला दूर ठेवत, त्याच्याशी कोणीही बोलत नसे, शिक्षकांनी इतर विद्यार्थ्यांना तसे सांगितले होते असेही या मुलाच्या आईने म्हटले.

याप्रकरणी आम्ही गुन्हा नोंदवून घेतला असल्याची माहिती कानपूरच्या पोलीस उप अधीक्षकांनी ‘एएनआय’ला दिली. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या या मुलाने एक सुसाईड नोटही लिहिली होती. ज्यामध्ये त्याने चार शिक्षकांची नावे लिहिली आहेत. आम्ही त्या चारही शिक्षकांची चौकशी करणार आहोत असेही पोलिसांनी म्हटले. त्याच्या सुसाईड नोटमध्ये शाळा, शाळेचे मुख्याध्यापक आणि चार शिक्षकांविरोधात गंभीर आरोप आहेत. सध्या या मुलावर कल्याणपूरच्या मधुराज नर्सिंग होममध्ये उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे असेही पोलिसांनी सांगितले आहे.