धन्यवाद.. मी आपला खूप खूप आभारी आहे. एक वसाहत असलेल्या या देशाने  स्वत:चे विधिलिखित ठरवण्याचा अधिकार मिळवला होता. आज दोनशे वर्षांनंतर पुन्हा एकदा या रात्री आपण आपले संघराज्य अधिक परिपूर्ण करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे.
परिपूर्णतेचे हे काम तुमच्यामुळेच पुढे चालले आहे. युद्ध व निराशा यांच्यावर विजय मिळवण्याच्या इच्छाशक्तीवर तुम्ही पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले आहे. याच जिद्दीतून आपण निराशेच्या गर्तेतून बाहेर येऊन आशेच्या शिखराकडे वाटचाल केली आहे. याच विश्वासातून अमेरिकेतील प्रत्येक व्यक्ती त्याची स्वप्नपूर्ती करण्यासाठी झटणार आहे. आपण अमेरिकावासी एक  कुटुंबच आहोत. आपण जे काही उभे राहणार किंवा पडणार ते एक देश म्हणून .. एक जनता म्हणून..
आज रात्री , या निवडणुकीत तुम्ही अमेरिकी लोकांनी एक जाणीव करून दिलीत, ती म्हणजे आपला रस्ता कठीण आहे, आपला प्रवास लांबचा आहे, आपण स्वत:ला नक्कीच वर काढले आहे, आपण पुन्हा एकदा उभारी धरली आहे व आपल्याला मनोमन याची खात्री आहे की, अमेरिकेसाठी अजूनही जे चांगले काहीतरी करायचे आहे ते बाकी आहे..
 या निवडणुकीत सहभागी झाल्याबद्दल प्रत्येक अमेरिकी नागरिकाला मी धन्यवाद देतो.. तुम्ही कदाचित प्रथमच मतदान केले असेल किंवा प्रदीर्घ काळ रांगेत उभे राहून मतदान केले असेल.. तुम्ही कदाचित फोन उचलला असेल.. तुम्ही ओबामा किंवा रोम्नी कुणाचाही झेंडा हाती धरला असेल तरी तुम्ही तुमचा आवाज पोहोचवलात व फरक घडवून दाखवलात. मी नुकताच गव्हर्नर रोम्नी यांच्याशी बोललो. त्यांचे व पॉल रायन यांचे अटीतटीच्या लढतीतील अव्याहत प्रचारासाठी अभिनंदन केले.
आम्ही अगदी आवेशाने ही निवडणूक लढवली, पण तो आवेश मनात खोलवर असलेल्या देशप्रेमातून आलेला होता. या देशाच्या भवितव्याची आम्हाला काळजी आहे. जॉर्ज ते लिनोर ते त्यांचा मुलगा मिट यांच्यासह सर्व रोम्नी कुटुंबीय यांनी लोकसेवेतून अमेरिकेला आपण काही देणे लागतो या भावनेतून काम केले. याच वारशाचा आपण आज सन्मान करीत आहोत व त्याला दाद देत आहोत.
पुढील काही आठवडय़ात, मी गव्हर्नर रोम्नी यांच्यासमवेत बसून देशाला पुढे नेण्यासाठी एकत्रितपणे कसे काम करता येईल, यावर चर्चा करणार आहे.
गेल्या चार वर्षांत माझे सहकारी असलेले मित्र, सर्वात चांगले उपाध्यक्ष जो बिदेन यांचेही आभार मानतो.
वीस वर्षांपूर्वी जिने माझ्याशी विवाह करण्यास तयारी दर्शवली ती माझी पत्नी मिशेल हिच्याशिवाय मी आता जो आहे तो बनू शकलो नसतो. मी जाहीरपणे सांगतो.. मिशेल, मी तुझ्यावर एवढे जास्त प्रेम केले नाही, जेवढे देशाची प्रथम महिला म्हणून अमेरिका तुझ्या प्रेमात पडली, त्याचा अभिमान वाटला. साशा व मलिया तुम्ही आमच्या डोळ्यादेखत मोठय़ा होत आहात. पुढे तुम्ही कणखर, चाणाक्ष व अर्थातच रूपसंपन्न तरूण महिला व्हाव्यात; अगदी तुमच्या आईसारख्या. बाळांनो, मला तुमचा अभिमान वाटतो, पण एकच सांगतो, सध्या एकच कुत्रा आपल्याकडे आहे तो पुरेसा आहे.
देशाच्या राजकीय इतिहासातील एक उत्तम प्रचार-चमू व स्वयंसेवी कार्यकर्ते आपण पाहिले. उत्तम.. आतापर्यंतचा उत्तम प्रचार चमू.. तुमच्यापैकी काही जण या वेळी नवीन असतील. काही जण सुरूवातीपासून माझ्याबाजूने असतील.
तुम्ही सर्व जण एक कुटुंब आहात. तुम्ही काय केले व तुम्ही येथून कोठे जाणार आहात हा प्रश्न नाही, तुम्ही इतिहासाच्या स्मृती घेऊन जात आहात. एका अध्यक्षाने तुमच्या कामाचे केलेले कौतुक आयुष्यभर तुमच्याबरोबर असेल. प्रत्येक खाचखळग्यातून वाट काढताना, शिखरे व दरीतून मार्गक्रमण करताना तुम्ही जी मोलाची साथ दिलीत, माझ्यावर विश्वास दाखवलात त्याबद्दल शतश: धन्यवाद..
तुम्ही मला या मार्गक्रमणात सतत साथ दिलीत. तुम्ही जे केलेत त्यासाठी मी तुमचा ऋणी आहे
मला माहीत आहे, राजकीय प्रचार मोहिमा या काहीवेळा फार छोटय़ा व मूर्खपणाच्या वाटतात. टीकाकारांना त्यातून बरेच खाद्यही मिळते. राजकारण म्हणजे अहंगंडाची, ‘मी’ पणाची लढाई आहे, काही विशेष हितसंबंधांची लढाई आहे, असेच त्यातून सूचित होते. पण जर तुम्हाला आमच्या प्रचारसभांना आलेल्या, हायस्कूल, जिममधील सभेत अडथळ्याच्या दोरांना न जुमानणाऱ्या गर्दीतील  लोकांशी बोलायची कधी संधी मिळाली किंवा छोटय़ाशा परगण्यातील प्रचार कार्यालयात रात्री उशिरापर्यंत काम करणाऱ्या लोकांशी बोलायला मिळाले तर निवडणुकीची ही लढाई म्हणजे वेगळे काहीतरी आहे याचा शोध तुम्हाला लागेल. तुम्हाला प्रत्यक्ष काम करणाऱ्या संघटकांमध्ये,स्वयंसेवकांच्या आवाजात एक निश्चयी सूर दिसेल, जो अगदी त्याच्या महाविद्यालयीन काळापासून काम करीत आहे. प्रत्येक मुलाला समान संधी मिळाली पाहिजे हा दुर्दम्य आशावाद त्याच्या अंतरी आहे. प्रचारासाठी दारोदार फिरणाऱ्या स्वयंसेवक-सेविकेच्या आवाजात तुम्हाला स्वाभिमान जाणवेल, कारण तिच्या भावाला स्थानिक ऑटो प्रकल्पात नोकरी मिळाली आहे. लष्करी जवानाची पत्नी रात्री उशिरापर्यंत फोनवर काम करीत असताना आज देशभक्तीने ओतप्रोत भरलेल्या सुरात बोलत आहे, तिला आता याची खात्री पटली आहे की, आता या देशात कुणालाही नोकरी मिळवण्यासाठी जिवाचा आटापिटा करावा लागणार नाही. घरी आल्यानंतर त्यांच्या डोक्यावर छप्पर असेल. त्यासाठीच प्रचार वगैरे हे सर्व केले. हेच राजकारण असू शकते. त्यामुळे निवडणुकांना महत्त्व आहे. ही छोटी नाही, मोठी गोष्ट आहे. तीस कोटी लोकसंख्या असलेल्या देशाची लोकशाही ही गुंतागुंतीची, गोंधळाची आहे. आपल्याला आपली स्वत:ची मते आहेत. आपले काही विश्वास व समजुती आहेत. आपण कठीण काळातून जात असताना, देशासाठी मोठे निर्णय घेत असताना त्यात आवडीनिवडींना थोडा धक्का बसतो, काही वेळा वादविवादही होतात.ते सगळे एका रात्रीत बदलणार नाही व बदलायलाही नको. आपण जे युक्तिवाद करतो ते आपल्या स्वातंत्र्याचे लक्षण आहे. आज आपण येथे बोलू शकतो, पण दूरदेशीचे लोक कुठल्याही प्रश्नावर मत मांडायला मिळावे, आज आपण जसे मतदान केले तसा मतदानाचा हक्क मिळावा यासाठी लढताना प्राणांची बाजी लावत आहेत, हे विसरू नका.मतभेद असले तरी आपल्यापैकी बहुतेकजण अमेरिकेच्या निश्चित भवितव्यासाठी मतांचे आदानप्रदान करीत आहेत. जिथे चांगल्या शाळा, चांगले शिक्षक आहेत अशा देशात आपली मुले वाढावीत असे आपल्याला वाटते आहे.. जगातील तंत्रज्ञान व अभिनवतेतील अग्रेसर नेता असलेला देश हा आपला वारसा आहे, त्यामुळे चांगल्या नोकऱ्या व उद्योग आपोआपच येणार आहेत. ज्या अमेरिकेवर कर्जाचे ओझे नाही, असमानता नाही, पृथ्वी ग्रहाला तापवणाऱ्या जागतिक तापमानवाढीची भीती नाही अशा देशात आपल्या मुलांनी रहावे ही आपली इच्छा आहे. सुरक्षित जगात ज्याला मान आहे, ज्याची जगात प्रशंसा होते, अतिशय कणखर लष्कर ज्याचे संरक्षण करते,आतापर्यंतचे जगातील सर्वोत्तम लष्कर ज्या देशाकडे आहे, असा देश आपल्याला पुढील पिढीकडे द्यायचा आहे.