मोदी सरकारला तीन वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या सर्वेक्षणात देशात मोदी लाट अद्याप कायम असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे आता निवडणूक झाल्यास राष्ट्रीय लोकशाही आघाडीला मोठे यश मिळेल, असे सर्वेक्षणातून दिसून आले आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या मतांमध्ये ११ टक्क्यांची वाढ होईल, असे टाईम्स नाऊ-वोटर्समूड रिसर्च यांच्या सर्वेक्षणातून दिसून आले आहे.

आता निवडणूक झाल्यास मोंदीच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीला ३४२ जागांवर यश मिळेल, असे सर्वेक्षणातील आकडे सांगतात. तर भाजप २८४ जागा खिशात घालेल, असा सर्वेक्षण अहवाल सांगतो. आता निवडणूक झाल्यास काँग्रेसला अवघ्या ५८ जागा मिळतील, असे सर्वेक्षण अहवालात नमूद करण्यात आले आहे. या अहवालातील आकडे प्रादेशिक पक्षांसाठी धोकादायक आहेत. आता लोकसभा निवडणूक झाल्यास पश्चिम बंगालमध्ये भाजपला आधीच्या तुलनेत दुप्पट मतदान होईल. सध्या पश्चिम बंगालमध्ये भाजपला मिळणाऱ्या मतांची टक्केवारी १७ टक्के आहे. ही आकडेवारी वाढून ३३ टक्क्यांवर जाईल, असा सर्वेक्षण अहवाल सांगतो. तर तृणमूल काँग्रेसच्या मतांची टक्केवारी ४० वरुन ३७ टक्क्यांवर येईल, असे सर्वेक्षणातून समोर आले आहे.

ओडिशातील बीजू जनता दलाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. सर्वेक्षणानुसार, नवीन पटनाईक यांच्या बीजू जनता दलाच्या मतदानाच्या टक्केवारीत मोठी घट होणार आहे. बीजू जनता दलाला मिळणारे मतदान ३० टक्क्यांवरुन १७ टक्क्यांवर येईल, असे सर्वेक्षणातून पुढे आले आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नवीन पटनाईक यांच्या पक्षाला मिळणाऱ्या मतांचे प्रमाण ४५ टक्क्यांवरुन ३७ टक्क्यांवर आले होते. भाजपला मिळणाऱ्या मतदानाची टक्केवारी मात्र वाढताना दिसते आहे. आता निवडणूक झाल्यास भाजपला ओडिशात ४२ टक्के मतदान होईल. याआधी भाजपला ओडिशात २१ टक्के मतदान झाले होते.

देशातील सर्वाधिक लोकप्रिय नेत्यांचा विचार केल्यास पंतप्रधान मोदींना ६० टक्के लोकांनी पसंती दिली आहे. तर राहुल गांधी यांना पसंती देणाऱ्यांचे प्रमाण ११ टक्के इतके आहे. तर ३.६४ टक्के लोकांनी अरविंद केजरीवाल यांना पसंती दिली आहे. मोदी देशाचे आतापर्यंतचे सर्वोत्तम पंचप्रधान असल्याचे ३१ टक्के जनतेला वाटते. तर इंदिरा गांधी सर्वोत्कृष्ट पंतप्रधान असे वाटणाऱ्यांची संख्या २३ टक्के वाटते.