येथील नौहाटा भागात जामिया मशिदीच्या बाहेर पोलिस उपअधीक्षक महंमद अयुब पंडित यांना जमावाने विवस्त्र करून हातपाय मोडून ठार केल्याच्या प्रकरणी वीस जणांना जम्मू काश्मीर पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या महिन्यात २२ जूनला पंडित यांना जमावाने ठेचून ठार केले होते.

जम्मू काश्मीरचे पोलिस महानिरीक्षक मुनीर खान यांनी सांगितले, की या हल्ल्यात सामील असलेला एक दहशतवादी १२ जुलैला चकमकीत मारला गेला आहे. या प्रकरणी अजून चौकशी सुरू असून आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे. यातील वीस आरोपींना अटक केली असून एक दहशतवादी बडगाममधील रेडबुग भागात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत १२ जुलैला मारला गेला. या प्रकरणाची चौकशी वेगाने सुरू असून ती पूर्ण झाल्यानंतर अहवाल न्यायालयात सादर केला जाईल. उर्वरित हल्लेखोरांची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. गुन्ह्य़ातील इतर पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. हत्या करण्यासाठी वापरलेले लोखंडी गज, पंडित यांचे ओळखपत्र, सव्‍‌र्हिस पिस्तूल व सेल फोन ताब्यात घेण्यात आले आहेत. या हल्ल्याबाबत लोकांनीच महत्त्वाची माहिती पोलिसांना दिली आहे, त्यामुळे चौकशीत प्रगती होत आहे.

या प्रक रणाचा समाजाच्या सर्व स्तरांतून निषेध झाला असून लोक व साक्षीदार स्वत:हून चौकशीत सहकार्यासाठी पुढे आले आहेत. सुरूवातीला तीन जणांना अटक करण्यात आली, त्यांच्या जाबजबाबातून आणखी काही जणांना अटक करण्यात येऊन पुरावेही मिळाले. घटनाक्रम जुळवताना असे लक्षात आले, की मशिदीजवळ त्या वेळी दहशतवादी कमांडर झाकिर मुसा व हुरियतचे नेते मिरवेझ उमर फारूख यांच्या स्वागतासाठी घोषणाबाजी सुरू होती. त्या वेळी चार जणांनी पोलिस उपअधीक्षक पंडित यांना मशिदीतून बाहेर येताना पाहिले. त्या चार जणांनी त्यांचे ओळखपत्र मागितले, त्यांनी ते देण्यास नकार दिला तेव्हा जमावाने त्यांना मारहाणीस सुरूवात केली. त्यानंतर पंडित यांनी काहींवर कमरेखाली गोळ्या झाडल्या, त्यात तीन हल्लेखोर जखमी झाले पण जमाव पंडित यांना मारतच राहिला व त्यात त्यांचा मृत्यू झाला. पंडित यांचा मृतदेह ओळखण्यास वेळ लागला कारण तो विद्रूप करण्यात आला होता. त्याभागातील पोलिसांनी कर्तव्यात कसूर केल्याचा आरोप फेटाळून मुनीर खान यांनी सांगितले की, पंडित यांनी संबंधित पोलिस स्टेशनशी संपर्क साधला नव्हता. मिरवैझ यांचे समर्थक या हल्ल्यात सामील होते का, असे विचारले असता, चौकशी चालू आहे, असे उत्तर त्यांनी दिले.