दिल्लीतील रोहिनी या भागामध्ये तीन वर्षे वय असलेल्या जुळ्या भावंडांचा वॉशिंग मशीनमध्ये पडून मृत्यू झाला आहे. शहरातील अवंतिका कॉम्प्लेक्समध्ये शनिवारी दुपारी ही दुर्दैवी घटना घडली.  सर्व घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर हा अपघात असावा असे पोलिसांनी म्हटले आहे. दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचा अहवाल शल्यविच्छेदनानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला आहे.  रोहिनी येथील अवंतिका कॉम्प्लेक्समध्ये राहणाऱ्या राखीने कपडे धुण्यासाठी काढले होते. तिच्या बाजूलाच निशू आणि लक्ष्य ही दोन मुले खेळत होती. राखीने आपल्या वॉशिंगमशीनमध्ये पाणी भरले आणि ती दोन्ही मुलांना त्या फ्लॅटमध्येच सोडून डिटर्जंट पावडर आणण्यासाठी घराला बंद न करताच खाली असलेल्या दुकानात गेली.  पाच ते सहा मिनिटांनंतर घरात पोहचल्यानंतर तिला दोन्ही मुले दिसली नाही. घराचा दरवाजा उघडाच होता.

तिने मुलांचा शोध घेण्यास सुरुवात केली. काही वेळ शोध घेतल्यानंतर मुले सापडली नाहीत. त्यामुळे राखीने आपल्या पती रवींद्र यास फोन केला. तो १० मिनिटातच घरी परतला. त्याने देखील सर्व ठिकाणी शोध घेतला. जेव्हा तो बाथरुममध्ये गेला तेव्हा त्याला जबर धक्का बसला. दोन्ही मुले वॉशिंग मशीनच्या टम्बलरमध्ये पडलेली दिसली. त्यांचे पाय वरच्या दिशेने होती. त्यांनी त्वरित मुलांना रुग्णालयात दाखल केले. त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.  बाजूला असलेल्या बादलीच्या सहाय्याने ते दोघे वॉशिंगमशीनवर चढले असावे. आतमध्ये वाकून पाहताना त्यांचा तोल जाऊन ते पडले असावे असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलीस सर्व अंगांनी या घटनेची चौकशी करत आहेत. या घटनेनी कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.  राखी आणि रवींद्र यांना १० वर्षांचा आणखी एक मुलगा आहे. तो त्यावेळी शाळेत होता. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दोन्ही मुले एकाच वेळी कशी चढली आणि वॉशिंग मशीनमध्ये कशी पडली याचा पोलीस तपास करत आहेत.