उत्तर प्रदेशचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे सोशल मीडियावर नवे प्रोफाइल तयार करण्यात आले आहे. या महिन्याच्या १९ तारखेला उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेल्या योगी आदित्यनाथांचे ट्विटर हँडल @Yogi_Adityanath असे होते, जे बंद करून @myogiadityanath या यूजरनेमने नवे प्रोफाईल तयार करण्यात आले आहे. या नवीन खात्यावर योगींचा निवडणूक प्रचार आणि मुख्यमंत्री झाल्यानंतरच्या घटनांचे ट्विटस् करण्यात आले आहेत. याशिवाय त्यांच्या नावाने फेसबुकवर एका नवीन पेजची निर्मितीदेखील करण्यात आली आहे. या फेसबुक पेजचे यूजरनेमसुध्दा myogiadityanath असेच ठेवण्यात आले आहे. योगींचे जुने प्रोफाईल ट्विटरकडून व्हेरिफाइड करण्यात आले होते. नवीन प्रोफाईलदेखील काही दिवसांपूर्वीच व्हेरिफाइड करण्यात आले आहे. तर फेसबुकवरील त्यांचे नवीन पेज अद्याप व्हेरिफाइड होणे बाकी आहे. योगींची सोशल मीडिया हँडल्स बदलल्याची माहिती खुद्द भाजपच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून बुधवारी जाहीर करण्यात आली.

योगींचे जुने खाते २२ मार्चपर्यंत सक्रिय होते. नवीन खाते २२ मार्च रोजी व्हेरिफाइड करण्यात आले. त्यांच्या जुन्या खात्यावरून राम मंदिर आणि हिंदू-मुस्लिम ऐक्याला धोका निर्माण होईल असे अनेक वादग्रस्त संदेश पोस्ट करण्यात आले होते. योगींचे खाते बंद करण्यामागे त्यांचे एक जुने ट्विट कारणीभूत असल्याचे बोलले जाते. मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांचे एक जुने ट्विट व्हायरल होत होते. त्या ट्विटचा संभाव्य धोका लक्षात घेऊन, तसेच कोणत्याही वादापासून स्वत:ला दूर ठेवण्यासाठीच नवीन प्रोफाइल तयार करण्यात आल्याची चर्चा लोकांमध्ये आहे.