भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी पत्रकारांना पाहताच पळ काढला आहे. व्हायब्रंट गुजरात संमेलनात सहभागी होण्यासाठी उर्जित पटेल बुधवारी (११ जानेवारी) गांधीनगरमध्ये आले होते. यावेळी उर्जित पटेल महात्मा मंदिरात गेले होते. यावेळी त्या ठिकाणी बरेच पत्रकार उपस्थित होते. नोटाबंदीच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांना उर्जित पटेल यांना अनेक प्रश्न विचारायचे होते. पत्रकार प्रश्नांची सरबत्ती करणार, याचा अंदाज उर्जित पटेल यांना आला आणि त्यांनी महात्मा मंदिराच्या मागील दरवाज्याने पळ काढला. नवभारत टाईम्सने याबद्दलचे वृत्त दिले आहे.

पत्रकारांचे प्रश्न टाळण्यासाठी उर्जित पटेल यांनी मंदिराच्या मागील दरवाज्याचा वापर केला. मात्र तरीही काही पत्रकारांनी उर्जित पटेल यांना पाहिले. उर्जित पटेल यांना प्रश्न विचारण्यासाठी पत्रकार शिड्यांकडे धावले. मात्र पत्रकार येत असल्याचे पाहताच उर्जित पटेल वेगाने धावू लागले. काही पायऱ्या सोडत अगदी ट्रेन पकडण्यासाठी धावत असल्याप्रमाणे उर्जित पटेल गाडीकडे धावू लागले. अखेर उर्जित पटेल त्यांच्या गाडीजवळ पोहोचले. त्यांनी पटकन गाडीचा दरवाजा उघडला, ते गाडीत बसले आणि गाडी वेगाने निघून गेली.

दोन महिन्यांपूर्वी म्हणजेच ८ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित करताना नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला. या निर्णयामुळे पाचशे आणि हजाराच्या नोटा चलनातून बाद झाल्या. यामुळे देशात अभूतपूर्व चलनकल्लोळ निर्माण झाला. नोटा बदलून घेण्यासाठी लोकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागले. जवळपास शंभर जणांचा नोटा बदलण्यासाठी रांगेत उभे असताना मृत्यू झाला. पंतप्रधान मोदींच्या नोटाबंदीचा निर्णयाला विरोधकांनी जोरदार विरोध केला. हिवाळी अधिवेशनाचे कामकाज नोटाबंदीवरुन वारंवार स्थगित करण्यात आले. नोटाबंदीच्या निर्णयावरुन रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनादेखील विरोधाला सामोरे जावे लागले. नोटाबंदीच्या निर्णयाच्या सव्वा महिन्यानंतर उर्जित पटेल रिझर्व्ह बँकेच्या एका बैठकीसाठी कोलकात्याला गेले होते. त्यावेळी त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून ‘उर्जित पटेल गो बॅक, उर्जित पटेल हाय हाय,’ अशा घोषणादेखील देण्यात आल्या.

उर्जित पटेल पश्चिम बंगालमध्ये असतानाच तृणमूल काँग्रेसनेदेखील नोटाबंदीच्या विरोधाची धार तीव्र केली. पटेल यांच्या दौऱ्यावेळी तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी नोटाबंदीच्या निर्णयाचा जोरदार निषेध नोंदवला. नव्या नोटांचा पुरेसा पुरवठा न झाल्याने रिझर्व्ह बँकेच्या कार्यालयासमोर तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. रिझर्व्ह बँकेच्या संचालकांच्या बैठकीसाठी उर्जित पटेल कोलकात्याला आले होते. रिझर्व्ह बँकेच्या कार्यालयासमोर तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी उर्जित पटेल यांना काळे झेंडे दाखवले. नोटाबंदीचा निर्णय मागे घेण्यात यावा, यासाठी तृणमूलकडून हे आंदोलन करण्यात आले होते.