अमेरिकेत गेल्या सहा महिन्यांत सरासरी वृद्धिदर ४.२ टक्क्यांवर गेला असून नोव्हेंबर महिन्यापर्यंत २.६५ दशलक्ष अतिरिक्त नोकऱ्या उपलब्ध झाल्याने देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी २०१४ हे वर्ष मैलाचा दगड ठरले आहे, असे व्हाइट हाऊसच्या वतीने सांगण्यात आले.
अमेरिकेचा वृद्धिदर गेल्या सहा महिन्यांत ४.२ टक्क्यांवर गेला असून गेल्या दशकातील हा सर्वात मोठा दर आहे, असे नॅशनल इकॉनॉमिक कौन्सिलचे संचालक जेफ झिण्टस यांनी वार्ताहरांना सांगितले.
अमेरिकेत घरांच्या किमती वाढल्या आहेत, व्यापारामुळे गेल्या ५७ महिन्यांत १०.९ दशलक्ष नोकऱ्या उपलब्ध झाल्या आहेत. या वर्षी नोव्हेंबर महिन्यांपर्यंत अतिरिक्त २.६५ दशलक्ष नोकऱ्या उपलब्ध झाल्या असून १९९० पासूनचा हा उच्चांक आहे, असेही झिण्टस यांनी सांगितले. अलीकडेच आलेल्या आर्थिक मंदीनंतर अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने ही बाब महत्त्वाची असल्याचे मानले जाते.
वाणिज्यिक सेवा, तंत्रज्ञान आणि उत्पादन यामध्ये नोकऱ्यांच्या संधी याहूनही जास्त आहेत. सरासरी वेतनाहून जास्त वेतन देणारी हे क्षेत्रे  असल्याने ही महत्त्वाची बाब आहे, असेही ते म्हणाले.