क्लॉक बॉम्ब बनविल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आल्यामुळे चर्चेत आलेला अहमद मोहम्मद लवकरच शिक्षणासाठी कतारला स्थलांतरित होणार आहे. अहमदने अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची भेट घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी अहमद कतारला निघून जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी ट्विटरवर हातात बेड्या घातलेल्या अहमदचे छायाचित्र पोस्ट करण्यात आले होते. त्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला होता. दरम्यान, अहमदच्या शिक्षणासाठी मिळालेल्या पाठिंब्याबद्दल त्याच्या आई-वडिलांनी सगळ्यांचे आभार मानले आहेत. अहमदच्या उच्च माध्यमिक आणि पदवीपूर्व शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळाल्याने त्याने कतारला जाण्याचा निर्णय घेतल्याचे त्याच्या वडिलांनी डल्लास मॉर्निंग न्यूज या वृत्तपत्राला सांगितले.


अमेरिकेच्या टेक्सास प्रांतातील शाळेत शिकणाऱ्या अहमदला बॉम्ब बनविल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. संगणक आणि तंत्रज्ञान या विषयांची आवड असलेल्या अहमदने एक डिजिटल घड्याळ तयार केले होते. हे घड्याळ शिक्षकांना दाखविण्यासाठी अहमद शाळेत घेऊन गेला होता. पण वर्गात शिक्षक शिकवत असताना त्या यंत्रातून बारकासा आवाज आला. शिक्षकांनी याबद्दल विचारले असता अहमदने आपले घडय़ाळ त्यांना दाखवले. मात्र, या घड्याळात बॉम्ब असल्याचा संशय आल्याने शिक्षकांनी पोलिसांना पाचारण केले. त्यानंतर पोलिसांनी शाळेतच त्याची दीड तास कसून चौकशी केली होती आणि त्याला गजाआड केले होते. मात्र, अहमद निर्दोष असल्याचे सिद्ध झाल्यावर आंतरराष्ट्रीय पातळीवर याप्रकरणाची प्रचंड चर्चा झाली होती. मुस्लिम असल्यामुळेच अहमदला अशी वागणूक देण्यात आल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या होत्या. त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांनी अहमदला व्हाईट हाऊसमध्ये येण्याचे निमंत्रण दिले होते. याचबरोबर गुगलने त्याला आपल्या विज्ञान जत्रेत सहभागी होण्याचे आमंत्रण दिले होते. रेडिफ, ट्विटर या कंपन्यांनीही त्याला प्रशिक्षणार्थी म्हणून घेण्याचे ठरविले होते, तर फेसबुकचे निर्माते मार्क झकरबर्ग यांनी त्याला आपल्या कंपनीच्या मुख्यालयास भेट देण्यासाठी पाचारण केले होते.