उरीवरील दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत अमेरिकेने पाकिस्तानला दहशतवादी संघटनांवर कारवाई करण्याचा सल्ला दिला आहे. अमेरिकेच्या सुरक्षा सल्लागार सुजेन राईस यांनी भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशी फोनवरून दहशतवादावर चर्चा केली. या प्रसंगी त्यांनी पाकिस्तान दहशतवादावर कठोर कारवाई करेल अशी अपेक्षा व्यक्त केली. या वेळी त्यांनी पाकिस्तानबाबत आपले मत व्यक्त केले.
लष्कर ए तोएबा, जैश ए मोहमदसह संयुक्त राष्ट्र संघाने बंदी घातलेल्या अनेक दहशतवादी संघटना व्यक्तींवर पाकिस्तानने प्रभावी कारवाई करावी, अशी भूमिका राईस यांनी वारंवार मांडल्याचे अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रवक्ते नेड प्राईस यांनी म्हटले.
उरी हल्ल्यानंतर सुझेन यांनी डोवाल यांच्याकडे उरी हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. त्यांनी या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांप्रती सांत्वना व्यक्त केली.
दरम्यान, पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा मुहम्मद आसिफ यांनी भारतावर अणुबॉम्ब फेकून नेस्तनाबूत करण्याची धमकी दिली आहे. एका पाकिस्तानी वृत्त वाहिनीशी बोलताना त्यांनी भारतापासून धोका निर्माण झाल्यास पाकिस्तान गप्प बसणार नसल्याचे म्हटले होते.